पहिल्या १२ महिन्यात बाळासोबत काय- काय घडते? जाणून घ्या

9 minute
Read
Marathi blog- taking care of baby during first 12 months.jpg

Highlights
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे जन्माला आलेले बाळ मोठेपणी कसे असेल हे लहानपनातच कळते. असे म्हटले जाते कि अभिमन्यू ने आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची कला शिकली होती त्यामुळे तो चक्रव्यूह भेदू शकला. उगवलेल्या रोपट्याला पाणी खत कीटकनाशके, सूर्यप्रकाश वेळेवर मिळाले कि हातात येणारे पिक सोन्यासारखेच असते. नवजात बालकाचे देखील असेच आहे. सुरुवातीचे १२ महिने त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फार महत्वाचे असतात, ज्यावर त्याचे भविष्य रेखांकित असते .

नन्हीं मुन्नी पाऊले घरात आली कि सर्व घर फुलून जाते. घरात पाळणा हलणार या विचारानेच घरात आणि समाजात आनंदाचे वातावरण असते. पहिलेच बाळ असेल तर सर्वांच्या आनंदाला सीमा उरलेली नसते. सर्वजण बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. बाळ जन्माला आले कि बाळाच्या अवतीभोवती कलकलाट असतो. परंतु बाळाची काळजी हि सर्वात मोठी आणि नाजूक जबाबदारी असते. बाळ आईच्या गर्भात असते तेव्हा सर्व गोष्टी त्याला अनुकूलरित्या आपोआपच मिळतात.  परंतु ते जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येते तेव्हा हे जग त्याच्यासाठी नवीन असते. ते बाळ  एका अर्थाने आपल्यासाठी देखील एलियन असते कारण आपल्याला देखील त्याची वाढ होताना त्याला समजून घेणे अवघड जाते. परंतु पहिल्या एका वर्षात बाळाची व्यवस्थित काळजी घेणे खूप महत्वाचे असते. कारण येथे ते आईच्या शरीरापासून विभक्त असते आणि विभक्त असताना आईला किंवा कुटुंबियांना त्याला शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ बनवणे गरजेचे असते. अशावेळी बाळाच्या बाबतीत असणाऱ्या गोष्टी खूप लक्षपूर्वक हाताळाव्या लागतात.

आत्ताच्या मॉडर्न जगात महिला 'चूल आणि मूल' या संकल्पनेच्या पलीकडे गेलेल्या आहेत. महिला घर संभाळून नोकरी - व्यवसाय देखील करतात.  या जबाबदाऱ्या पेलताना खूप मेहनत त्यांना घ्यावी लागत आहे. परंतु त्यांची चिंता वाढलेली असते हे मात्र खरे आहे. या इंटरनेटच्या जगात त्यांना या सर्व गोष्टी पार पाडताना माध्यमांचा हातभार नक्कीच लागतो. महिलांनी प्रसूतीनंतरच्या काळात बाळाची साधारणतः १ वर्षभर काळजी का आणि कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती आम्ही येथे देणार आहोत.

पहिले ६ महिने  बाळ  व आईने काय खाल्ले पाहिजे?

पहिले ६ महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे कारण आईच्या सुरुवातीच्या दुधामध्ये म्हणजेच चिकामध्ये प्रथिने, रोगप्रतिबंधक घटक आणि सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे तोच मुख्यतः नवजात बाळाचा आहार असायला पाहिजे, कारण स्तनपान हे बाळाच्या सुदृढ आयुष्याचा पाया घालत असते. पहिल्या ६ महिन्यात  बाळाची वाढ हि पूर्णतः आईवर अवलंबून असते अशावेळी आईने आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण बाळाच्या वाढीचे घटक हे आईच्या दुधातून मिळत असतात, जे तिच्या आहारातून मिळतात. आईने सकस आणि चौरस आहार खाल्ला पाहिजे.  तसेच आईला शांत एकांत वातावरण, पुरेशी विश्रांती, पुरेसे पाणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाळाला पाजण्याची इच्छा, या सर्व गोष्टी स्तनपानासाठी उपयोगी पडतात.

बाळंतपणानंतर आईने घ्यावयाची काळजी

  •  आईने दिवसातून नेहमीपेक्षा जास्त वेळा जेवले पाहिजे. मसालेदार, तिखट चटपटीत पदार्थ कमी खावे. बाळंतपणानंतर लगेचच गर्भ निरोधक गोळ्या घेऊ नयेत.
  • आईने कोणत्याही गोष्टीचा तणाव घेऊ नये. बाळंतपणानंतर स्त्रीला काहीसा बेडौलपणा येतो. गर्भाशय पूर्वावस्थेला येऊ लागते. अशावेळी हातापायांची हालचाल करणे, उताणे झोपून पाय गुडघ्यात दुमडून सरळ वर खाली करणे, पाय सरळ सोडून ताठ बसून पायांचे अंगठे हाताच्या बोटांनी पकडणे अशा हालचाली खूपच लाभदायक होऊ शकतात. त्याचबरोबर दिर्घश्वास घेणे-सोडणे, चालण्याचा व्यायामही करावा. अशा साध्या व्यायामपद्धती केल्या तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले बनू शकते.
  • काही स्त्रियांच्या बाळंतपणानंतर स्तनाग्रास चीर पडल्यामुळे बाळाला पाजताना खूप दुखते व छाती दाटते. अशावेळी चीर बरी होईपर्यंत बाळाला त्या स्तनावर पाजण्यास घेऊ नये.  स्तनातील दूध पिळून काढून छाती मोकळी करावी. स्तनातले दूध शोषून घेण्यासाठी औषधांच्या दुकानातुन एक पंप घेऊन दूध काढता येते, स्तन दाबायची गरज पडत नाही. त्या चिरेतून रक्त-पू येत नसेल तर हे दूध बाळाला वाटी-चमच्याने पाजण्यास काहीच हरकत नाही. स्तनांना खुली हवा व सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. दिवसातून दोन-तीनदा स्तन कोमट पाण्याने धुवावे. त्यावर जंतुनाशक मलम लावावे, ज्यामुळे जंतुची लागण होत नाही व चीर देखील भरून येते.

६ महिन्यानंतर बाळाचा आहार काय असला पाहिजे ?

आजकाल आईला पुरेसे दूध येत नसेल किंवा आजारपणामुळे दूध पाजायचे नसेल  तर पावडरचे दूध दिले जाते परंतु ते सर्वांना परवडेलच असे नाही. वरचे दूध म्हणून गाईचे दूध बाळाला दिले जाते, परंतु गाईच्या दुधातील ‘बीटा लॅक्टोग्लोब्युलिन’  प्रथिनांमुळे बाळाला पोटदुखी, जुलाब असे त्रास होतात. म्हशीचे दूध चांगले उकळून व गाळून देणे योग्य ठरेल. सहा महिन्यानंतर बाळाची भूक वाढू लागते त्यामुळे त्याला हळूहळू पूरक आहार द्यायला सुरुवात करावी. आजकाल तयार सीरियल्स सर्वत्र मिळतात. पण स्वच्छता, ताजेपणा, पोषणमूल्ये या सर्वांचा विचार करता आपण घरीच पूरक आहार बनवून देणे चांगले आहे. सुरुवातीला पातळ आहार द्यावा.  जसे कि भाताची पेज, तांदूळ धुऊन, सुकवून, भाजून त्याची रव्यासारखी पावडर बनवावी आणि मऊ शिजवून दुधात मिसळून द्यावी. ती पचू लागल्यावर वेगवेगळ्या डाळींची पेज द्यावी. केळी, सफरचंद, पेअर, स्ट्रॉबेरी, चिक्कू,आंबा, कलिंगड अशी मोसमी फळे, स्वच्छ धुऊन, साली काढून, वाफवून त्याची प्यूरी करून द्यावी. भोपळा, टोमॅटो, गाजर, बटाटा, फ्लॉवरसारख्या भाज्याही मऊ शिजवून लगदा करून द्याव्यात. सुरुवातीला वरचा आहार बाळ जास्त खाणार नाही. एक दोन घासानंतरच ते कंटाळेल, तोंडातून अन्न बाहेर काढेल, रडेल अशा वेळी धीर धरावा. जबरदस्ती खाऊ घालू नये. बाळाला भरवून झाले कि स्तनपान करावे. हळूहळू बाळाची भूक वाढेल. एक वर्षापर्यंत तरी बाळाचे स्तनपान चालू ठेवावे.

बाळासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ?

बाळाला खायला देताना गप्पा गोष्टी, गाणी म्हणावी परंतु मोबाईल दाखवू नये. बाळाला रेडिमेड फूड देणे टाळावे. साखर मीठ बाळगुटी गूळ हे खायला देऊ नये. वरचे दूध सहसा टाळावे. घशात अडकणारे पदार्थ किंवा चावून खावे लागणारे पदार्थ टाळावेत, जसे कि शेंगदाणा, पॉपकॉर्न, काजू, द्राक्षे, डाळिंबाचे दाणे इत्यादी. मध, मासे, सोयाबीन, अंड्याचा पांढरा भाग हे पदार्थ देखील टाळावेत.  

१२ महिन्यात बाळाचा विकास

पहिल्या ६ महिन्यात बाळाचा शारीरिक मानसिक आणि संज्ञानात्मक विकास होतो. या काळात बाळ रडते, पाय ताणून किक मारते. व्यक्तींना पाहून स्मित हास्य करते . मूठ वळवून हातात वस्तू पकडते. बोललेले कान टवकारून ऐकते. मोठ्याने आवाज काढणे, रांगणे, आवाज दिल्यास  प्रतिसाद देणे, आधाराने चालणे या सर्व गोष्टी बाळ हळूहळू करू लागते. ६ ते १२ व्या महिन्यापर्यंत बाळाचा विकास वेगाने झालेला दिसेल. यामध्ये बाळ ते अनुकरण करू लागेल, शब्दोच्चार करेल, चालण्याचा प्रयत्न करेल, स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकेल, स्वतःच खायला सुरु करेल आणि जास्त वेळ खेळेल.

समारोप

अशा पद्धतीने १ वर्षापर्यंत काळजी घेतली गेली तर वरीलप्रमाणे बाळाची शारीरिक आणि मानसिक प्रगती होऊन बाळ सुदृढ आणि निरोगी राहू शकते. सुदृढ बाळ हे त्याचा आहार, स्वछता, आई आणि कुटुंबियांकडून मिळणारे खेळीमेळीचे आनंदी वातावरण , वेळोवेळी डॉक्टरांकडून होणाऱ्या तपासण्या आणि सल्ले, विशेष म्हणजे सुदृढ आणि निरोगी आई यावर अवलंबून असते.

image-description
report Report this post