महाराष्ट्रीयन लूक खुलवायचा असेल तर अशा पद्धतीने साडी घाला

7 minute
Read
navr.jpg

Highlights

जग कितीही पुढे गेले आणि कितीही बदललं तरी साडी ची क्रेझ किंचितही कमी होत नाही. आता साडी परदेशातही एक आकर्षक सुंदर पेहराव म्हणून लोकप्रिय बनला आहे. कुठलाही कार्यक्रम किंवा लग्न म्हटले कि लगेच साडीचा लूक डोळ्यासमोर येतो. विशेष म्हणजे प्रत्येक मुलाला मुलगी साडीतच जास्त आवडते. महाराष्ट्रीय साडीतील लूक हा तर सर्वांना भुरळच घालणारा आहे तर अशा या जादुई साडीला कशा पद्धतीने तुम्ही परिधान करू शकता आणि आकर्षणाचे केंद्र बनून स्वतःला अधिक मोहक आणि खुलवून ठेवणार याची माहिती घेऊ या.

सण - उत्सव, लग्न सराईत किंवा कोणताही कल्चरल इव्हेंट असेल तर महाराष्ट्रीयन साडी आवडीने घातली जाते. तसे पाहिले तर नऊवारी साडी ही महाराष्ट्राची ओळख मानली जाते. पूर्वी सर्वच बायका नऊवारी साड्या घालायच्या नंतर सहावारी साडी आली आणि त्यामध्ये बायका जास्त कम्फरटेबल समजू लागल्या. परंतु आजकाल नऊवारी साडीचा ट्रेंड प्रत्येक सणामध्ये दिसून येतो.  मराठी नववर्ष गुढीपाडवा आला की, सर्वच मुली अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. सण असो वा लग्न महाराष्ट्राच्या परंपरेत नऊवारी साडीला खूपच महत्त्व आहे. त्यातल्या त्यात आत मोबाईल मुळे व्हाट्सएप, इन्स्टाग्राम यावर आपल्या फ्रेंड्स किंवा नातेवाईकांना इम्प्रेस करण्यासाठी छान साडी घालून, मेकअप करून, वेगवेगळ्या पद्धतीने फोटो अपलोड केले जातात. त्यामुळे आपण कसे दिसले पाहिजे याकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते. त्यामध्ये पेहराव सर्वात महत्वाचा असतो. आपल्या लोकांना इंप्रेस करायचे म्हटले तर आपली महाराष्ट्रीयन ओळख दाखवणे म्हणजे साडीतला फोटो लईच भारी ! चला पाहूया महाराष्ट्राची नऊवारी आणि सहावारी साडी कशी आकर्षकरित्या घातली जाते ज्यामुळे तुमच्या लूक चा ठसा प्रत्येकाच्या डोळ्यात उमटला जाईल.

सुरुवातीला महाराष्ट्राची शान असलेली नऊवारी साडी स्टेप बाय स्टेप कशी नेसायची ते पाहूया

1 सर्वात आधी साडी ओपन करा

2 जो नेसता पदर कंबरेभोवती डावीकडून उजवीकडे लपेटून उजव्या बाजूला गाठ बांधा. ही गाठ बऱ्यापैकी घट्ट आवळून बांधा. त्यामुळे साडी सुटण्याची शक्यता नसते आणि नऊवारी साडी हि पूर्णतः या गाठेवर अवलंबून असते. आतमध्ये तुम्ही ३/४ स्लॅक्स किंवा लेगिन्स घालू शकता. पूर्वीच्या काळी बायका आतमध्ये काहीही घालत नव्हत्या कारण त्यांना फारशी गरज वाटली नाही.

3 नंतर दुसरी बाजू म्हणजे खांद्यावरच्या पदराचा भाग पकडून तो कंबरेला फिरवून त्याच्या निऱ्या काढायच्या आहेत. ज्यामुळे आपण आपल्या खांद्यावरचा पदर काढणार आहोत. निऱ्या बनवून पदर डाव्या खांद्यावर ब्लॉउज ला जोडून तो पिन लावून बसवा.  पदराची पहिली निरी हि इतर निऱ्यांपेक्षा मोठी ठेवा.  पदर काढताना थोडा लांबच ठेवा म्हणजे साधारणतः गुडघ्यापर्यंत ठेवा, कारण जस जशी साडी तुम्ही नसाल तसतसा पदर खेचला जाऊन तो कमी होत जातो.

4 आता पदराची आतील बाजू छातीवरून फिरवून मागच्या बाजूने पुढे आणा. पुढे आणताना ती कंबरेच्या बाजूने घट्ट ओढून आणून तात्पुरती कंबरेवर खोचा.

5 त्यानंतर पायामध्ये अंतर ठेवून मागचा पदर पुढे घ्या. पुढच्या बाजूस मध्यभागी हा पदर खोचलेल्या साडीतून आतून बाहेर काढायचा आहे. हा पदर घट्ट ओढून घेतला तरच मागचा भाग छान दिसेल.

6 आता उरलेल्या साडीच्या आपल्या निऱ्या काढायच्या आहेत जसे आपण सहावारी साडीला काढतो.

निऱ्या कशा काढायच्या

सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की, साडीच्या निऱ्या म्हणजे प्लेट्स या नेहमी सरळ आणि समान रेषेत असायला हव्यात. त्यासाठी तुमच्या साडीला व्यवस्थित इस्त्री करून ठेवा आणि त्यावर कोणतीही सुरकुती असू देऊ नका. निऱ्या काढताना एका बाजूचा पदराचा एक काठ अंगठा आणि करंगळीमध्ये पकडून नंतर अंगठ्याजवळची दोन बोटे पुढे करून तेवढ्या अंतरावरचा पार्ट पकडून परत मागे पुढे घेत एक एक प्लेट्स बनवत जा. सर्व निऱ्या बनवून झाल्यावर त्या सरळ एका रेषेत लावा. निऱ्या हलू नयेत म्हणून त्या पिन अप करा. 

7 नऊवारी साडीच्या निऱ्या सहावारी साडीच्या तुलनेत जास्त बनतात. त्या व्यवस्थित अरेंज करा. त्यानंतर सुरुवातीची पहिली निरी थोडी मोठी असू द्या आणि ती ओढून टाईट करून घ्या.

8 आता मागून पुढे आणलेला पदर आणि आणि मागचा खेचलेला पदर म्हणजेच सुरुवातीचा कमरेभोवती गुंडाळला पदर आणि निऱ्यांचा शेवटचा भाग हा ओढून चापून चोपून एकत्रित पिन अप करा. म्हणजे दिसताना शेप एकदम व्यवस्थित दिसेल.

9 त्यानंतर सर्व निऱ्या आत खोचून घ्या. त्या व्यवस्थित आणि सरळ खोचा जेणेकरून पोटाचा भाग फुगीर दिसणार नाही.

10 आता दोन पायांमध्ये अंतर ठेऊन निऱ्यांचा खालचा पायाजवळचा मध्यभाग पकडून तो मागे घेऊन मागच्या बाजूस खोचायचा आहे. मध्यभाग निवडताना लक्षात घ्या कि दोन्ही बाजूचे काठ एकाच अंतराचे असतील. मागे खोचण्यापूर्वी तो भाग घट्ट ओढून घ्या. त्याची दीड निरी बनवा आणि मग ती पाठीमागच्या बाजूस पदराच्या वरून आतमध्ये खोचा. नंतर पदर व्यवस्थित करून घ्या. नंतर पायाजवळील दुमडलेले काठ सरळ करून घ्या.

तुम्ही नऊवारी साडी नेसून तयार आहात

नऊवारी साडी घालण्याचे आत्ताच्या काळात अनेक प्रकार बनले आहेत. जसे कि, ब्राह्मणी नऊवारी साडी, नऊवारी सिल्क, कॉटन ब्लेंड नऊवारी साडी, बिग बॉर्डर नऊवारी, पैठणी नऊवारी, कोल्हापुरी नऊवारी, पेशवाई नऊवारी, कोळी नऊवारी, काष्टा साडी. हे सर्व नऊवारीचे प्रकार आहेत फक्त त्यांची स्टाईल साडीच्या प्रकारानुसार थोडीशी वेगवेगळी आहे. नाहीतर घालण्याची पद्धत सारखीच आहे.

महाराष्ट्रीयन सहावारी साडी स्टाईल

कोणतीही साडी नेसण्यापूर्वी जर तुम्ही उंच टाचेची चप्पल किंवा सॅंडल घालणार असाल तर ते तुम्ही अगोदर पायात घाला. नंतर साडी घालायला सुरुवात करा.

1 सर्वप्रथम साडी ओपन करून नेसता पदर ती उजव्या बाजूकडून टक इन करण्यास सुरुवात करा. मधल्या बाजूस साडी कधी टक इन करू नका. सगळीकडून साडी टक इन  करून ती जेथून सुरुवात केली होती तिथपर्यंत टक इन करत आणा.

2 आता खांद्यावरचा पदर कंबरेच्या उजवीकडून घेऊन पाठीमागे घेऊन पुढे आणा आणि डाव्या खांद्यावर पदर टाका. साधारणतः गुडघ्याइतकी पदराची लांबी ठेवा.

3 पदराची आतील किनार मागून पुढे ओढून समोरच्या बाजूस डाव्या कंबरेजवळ टाईट करून पिन अप करा.

4 आता निऱ्या बनवून घ्या. त्या तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूने बनवू शकता. निऱ्या बनवून झाल्यावर त्या सरळ लावा आणि पिन अप करा. निऱ्या आतमध्ये व्यवस्थित खोचा.

5 पायाजवळच्या निऱ्या देखील सरळ जुळवून घ्या.

6 आता आपण पदर करूया. पदर करताना बाहेरच्या काठाकडून पदर बनवायला सुरुवात करा. प्लेट्स करताना पहिली प्लेट्स थोडी मोठी ठेवा नंतरच्या सर्व प्लेट्स समान आणि पहिल्या प्लेट्सपेक्षा थोड्या छोट्या बनवा. सर्व प्लेट्स झाल्यानंतर शेवटी पिन लावा म्हणजे त्या हलणार नाहीत. आता सर्व प्लेट्स सरळ अरेंज करा. बाहेरची एक प्लेट सोडून आतल्या सर्व प्लेट्स पिन अप करा. व्यवस्थित एक- एक प्लेट सेट करून आता पदर खांद्यावर टाकून पिन अप करा . आता पदरच्या शेवटच्या भागाला पिन लावलेली ती काढून घ्या. आता पदराला फक्त एकच मुख्य पदरपिन असेल.

अशा पद्धतीने तुम्ही सुंदर अशी सहावारी साडी घातलेली असेल.

वरील सहावारी आणि नऊवारी साडीच्या स्टेप्स आणि ट्रिक्स तुम्हाला अतिशय सोप्या वाटतील. स्त्री किंवा मुलगी कुठेही असली आणि पहिल्यांदा जरी साडी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर वरील माहिती तुम्हाला साडी घालताना तुमच्या मनावरचं दडपण कमी करेल. अतिशय सुंदर आणि व्यवस्थित साडी घालण्यासाठी तुम्ही या सर्व स्टेप्स फॉलो करून घालू शकता. येणारा प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला साडी घालून सेलिब्रेट करायला छान वाटेल. तसेच साडी घालून काढलेले फोटो इतरांना शेअर करताना खूप आनंद होईल अशी आशा आहे. नऊवारी साडी घातली असेल आणि फोटो काढत असाल तर डोक्यावर फेटा देखील खूप आकर्षक वाटतो. नवनवीन गोष्टी ट्राय करून फॅशनबल राहणे हेच तर आपल्याला क्षणोक्षणी आनंद देऊन जाते.

image-description
report Report this post