२०० वर्षांपूर्वीच्या ५ पारंपरिक रेसिपी माहिती आहेत का ?

7 minute
Read
२०० वर्षांपूर्वीच्या रेसिपी.jpg

Highlights

महाराष्ट्रातील अनेक रेसिपी ह्या खूप जुन्या आणि दुर्मिळ होत असल्याने ती बनवण्याची पद्धती आणि त्या पदार्थांचे महत्व याची माहिती कुठे वाचायला किंवा ऐकायला खूप कमी मिळेल. तर या 200 वर्षपूर्वीच्या रेसिपी ज्या आपले पूर्वज बनवून खात होते यांची माहिती आपण येथे पाहणार आहोत.

आपल्या पूर्वजांचे जेवण अतिशय साधे आणि पौष्टिक होते. थेट शेतातून किंवा रानावनातून मिळणाऱ्या पाने फुले फळे यांच्यापासून ते रोजचे अन्न शिजवत असे. त्यामुळे ते अतिशय धष्टपुष्ट, मजबूत आणि रांगडे असायचे. आता आपली पिझ्झा बर्गर ची जनरेशन आहे. पटकन आणि जिभेला टेस्टी खायला मिळाले कि आपण खुश होतो. पण मग शरीराचं काय ? आपण लगेच आजारी पडतो. शरीर कमकुवत बनते. मग डॉक्टर डाएट चा सल्ला देतात आणि आपल्या जिभेला ज्याची सवय नसते ते खावे लागते. प्रत्येक भागाचा इतिहास असतो, हा इतिहास खाद्यसंस्कृतीचा देखील आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीतील लोप पावणाऱ्या किंवा नष्ट होत असलेल्या रेसिपी, ज्या अगदी काही ठिकाणी अगदी कमी प्रमाणात बनवल्या जातात.

1 हादग्याच्या फुलांची भाजी

हादग्याचे झाड गावाकडे कुठेही रानावनात उगवते. हे झाड आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या झाडाची पाने फुले आणि शेंगा विविध आजारांवर गुणकारी औषध म्हणून उपयोग केला जातो. रातांधळेपणा, कफ, सर्दी, पित्त, अर्धडोकेदुखी या सर्व विकारांवर मात करण्यासाठी हादग्याच्या पानांचा आणि फुलांचा वापर केला जातो. हादग्याला इंग्रजीमध्ये सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा असे म्हणतात. काही ठिकाणी याला अगस्ता किंवा सावर देखील म्हटले जाते. शेवग्याच्या झाडासारखेच हे झाड असते आणि शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच याला देखील शेंगा येतात ज्याची भाजी केली जाते. या फुलांच्या आतील भागात एक कोंब असतो तो काढून टाकून फुले बारीक चिरली जातात. तेलात जिरे मोहरी आणि लसूण टाकून फोडणी दिली जाते. नंतर कांदा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये टाकून परतून घेतले जातात. नंतर घरगुती मसाला टाकून त्यामध्ये फुले टाकून शिजवली जातात. त्यानंतर मीठ आणि भिजलेली मुगाची डाळ टाकून थोडा वेळ शिजवले जाते आणि शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त टेस्टी हादग्याची भाजी बनवली जाते. या फुलांचे भरीत, सांडगे, भजी देखील बनवले जातात. परंतु आता ही भाजी काही ठराविक भागातच खाल्ली जाते.

2 गव्हाच्या कोंड्याच्या डिकल्या 

गव्हाचे पीठ चाळून घेतल्यानंतर उरलेला कोंडा आपण फेकून देतो. परंतु पूर्वीच्या काळी याच गव्हाच्या कोंड्याच्या भाकरी केल्या जायच्या. गव्हाचा कोंडा फायबरयुक्त असतो. तो शरीराला खूप पोषक असतो. आता गव्हाचा कोंडा हा जनावरांना खायला दिला जातो तर डिकल्या कोण खाणार ? पूर्वी आजी बनवायची.  गव्हाचा कोंडा घेऊन त्यात आंबट ताक मिसळून ४ ते ५ तास भिजत ठेवतात. त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची पाण्यात भिजत ठेवा. भाजल्यानंतर त्यात हिरवी मिरची आले लसूण मिक्सरला पाणी न टाकता बारीक केले जाते. त्यानंतर ते भिजत घातलेल्या कोंड्यात मिक्स करून चवीपुरते मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून मिक्स केले जाते. पूर्वी लोक जांभळीच्या पानात गुंडाळून चाळणीत अळूच्या वड्यांप्रमाणे ह्या डिकल्या शिजवल्या जायच्या. २० ते २५ मिनिटांमध्ये या डिकल्या शिजल्या जातात. त्यानंतर जांभळीच्या पानांतून काढलेल्या या वड्यांवर, ढोकळ्यावर जे फोडणीचे मिश्रण वरून टाकले जाते ते टाकायचे. आता ह्या डिकल्या सहसा कुणी बनवत नाहीत.

3 पानगी

पूर्वी कोकणात पानगी आणि केळीचे शिकरण जेवायला असेल तर ती एक मेजवानीच ठरायची. जसे आजकाल आपण काही स्पेशल पार्ट्या देत असतो, त्याप्रमाणेच . हि पारंपरिक पौष्टिक पानगी आता क्वचितच बनवली जाते आणि खाल्ली जाते. पानगी हे फाटलेल्या म्हणजे खराब झालेल्या दुधाची बनवली जाते. हे दूध फेटून घेऊन त्यात गूळ, तूप, मीठ घालून बारीक एकत्र केले जाते. त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि कणिक देखील समप्रमाणात घालून थोडे पातळसे मिश्रण बनवले जाते. जसे आपण धिरडे बनवण्यासाठी करतो.  त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घातला जातो. त्यानंतर केळीच्या पानाला तूप लावून ते तव्यावर ठेऊन त्यावर मिश्रण टाकले जाते आणि त्यावर आणखी केळीच्या पानांनी झाकून ते शेगडीवर ५ मिनिटे ठेऊन उलटायच आणि पुन्हा ५ मिनिटे ठेवायचे. यावर केळीच्या पानाचे मार्क्स, टेक्श्चर आणि स्वाद आलेला असतो. या पानग्या केळीच्या शिकरण बरोबर खायच्या. पूर्वीच्या काळी हे खाल्यावर लोकांना सुख भेटायचं.

4 वास्त्यांची / बांबूची भाजी

अगदी मोजक्याच साहित्यात बांबूची भाजी बनविली जाते. पूर्वीच्या काळी जेवण बनविण्यासाठी खूप कमी साहित्य वापरले जायचे. वास्त्यांची किंवा बांबूची भाजी बनवण्यासाठी तेल, हळद, चिखट, मसाला, मीठ, लसूण, जिरे - मोहरी एवढेच साहित्य वापरले जाते. जमिनीतुन वर आलेले बांबूचे कोंब कापून काढले जातात. ते सोलून आतमधील पांढरा कोवळा भाग कापून त्याच्या चकत्या बनवून भाजी बनवली जाते. आदिवासी लोक हि भाजी आवडीने खातात. शहरी भागात तर याची कल्पना देखील नसेल. अगोदर कापलेल्या चकत्या उकळत्या पाण्यात चांगल्या शिजवून घेतल्या जातात. या शिजायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर त्या थंड करून पिळून घ्या. तव्यावर जिरे, मोहरी, लसणाची फोडणी देऊन कांदा परतून सर्व साहित्य टाकावे. नंतर पिळलेली बांबूची भाजी टाकायची आणि मिक्स करून थोडा वेळ तव्यावर किंवा कढईत ठेवायची. अशी तयार होते बांबूची भाजी. बांबूच्या फुलांची देखील भाजी केली जाते. हा देखील खूप दुर्मिळ प्रकार आहे जो कालांतराने नष्ट होईल.

5 दहीत्री

२०० वर्षांपूर्वीची ही पारंपरिक गोड रेसिपी आहे. पूर्वी दहीत्री म्हणून फेमस असलेली रेसिपी आज त्यामध्ये बदल करून जिलेबी किंवा खाजा म्हणून बनविली जाते. परंतु दहीत्री हा जिलेबी आणि खाजा पेक्षा पौष्टिक पदार्थ आहे. साखर आणि साखरेच्या दुप्पट पाणी घालून त्यामध्ये थोडेसे दूध आणि लिंबू घालून ते मंद आचेवर उकळून पाक बनवला जातो. तो गाळणीने गाळून पुन्हा तो दोन तारी घट्ट पाक बनवला जातो. दह्यामध्ये तेल, चवीपुरते मीठ, बेसनपीठ, मैदा, आरारोट घालून मिक्स केले जाते त्यामध्ये कोमट पाणी घालून पीठ ६ ते ७ तास भिजत ठेऊन तुपामध्ये छोट्या पुऱ्या तळल्या जातात. नंतर त्या पाकामध्ये सोडल्या जातात. अशी हि स्वीट डिश पूर्वी सण समारंभासाठी बनवली जायची जी आता लोप होत चालली आहे.

सारांश - 

आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये असे पोषक पदार्थ मिळणे अवघड आहे. तरुणाई पब संस्कृतीमध्ये चिकन, मटण, कोल्ड्रिंक्स आणि ड्रिंक्स मध्ये खुश असतात. या जुन्या रेसिपी आपल्या शरीराला खूप आवश्यक आहेत. त्यामुळे अशा पदार्थांच्या रेसिपी नव्याने परत केल्या गेल्या पाहिजे. त्या चाखल्या पाहिजे. सर्वांना त्या सांगून जगभर लोकप्रिय केल्या पाहिजेत ज्यामुळे आपली खाद्यसंस्कृती जोपासली जाईल आणि शरीर देखील मजबूत आणि आकर्षक बनेल.

image-description
report Report this post