जगातील पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म: प्लॅनेट मराठी

12 minute
Read
Untitled (1080 x 800 px) (1).png

Highlights
मराठी रसिकप्रेक्षकांना आपलं स्वतःचं, असं म्हणता येणारं एकही मराठी OTT प्लॅटफॉर्म नव्हतं. याच कळकळीतून प्लॅनेट मराठी या मूळ प्रोडक्शन होऊसच्या अंतर्गत अक्षय भादरपूरकर यांच्या नेत्तृत्वा खाली "प्लॅनेट मराठी" OTT याची सुरुवात करण्यात आली.

कोरोनाने आपल्या सगळ्यांनाच घरात डांबून ठेवलं आहे. अश्या परिस्थितीत ही आपल्या मनोरंजनाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मनोरंजन क्षेत्राने घेतली म्हणजेच, "Entertainment industry" यांनी घेतली. त्यात देखील प्रामुख्याने नाव समोर आले ते OTT प्लॅटफॉर्मचे. ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी५ आणि अजून बरीच . या OTT प्लॅटफॉर्म्स वर मराठी चित्रपट उपलब्ध होते. 

पण मराठी रसिकप्रेक्षकांना आपलं स्वतःचं, असं म्हणता येणारं एकही मराठी प्लॅटफॉर्म नव्हतं. कदाचित याच कळकळीतून प्लॅनेट मराठी या मूळ प्रोडक्शन होऊसच्या अंतर्गत अक्षय भादरपूरकर यांच्या नेत्तृत्वा खाली "प्लॅनेट मराठी" OTT याची सुरुवात करण्यात आली. 

जगातील सगळ्यात पाहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म म्हणजे "प्लॅनेट मराठी." अक्षय विलास भादरपूरकर यांनी प्लॅनेट मराठी या मूळ प्रोडक्शन होऊसच्या अंतर्गत "प्लॅनेट मराठी OTT" याची स्थापना केली. या OTT प्लॅटफॉर्म वर केवळ मराठी कन्टेन्ट उपलब्ध असले जसे की मराठी वेब सिरीज, मराठी सिनेमे, टॉक शो आणि अजून बराच काही...!

 

Source: indiatelevision

अक्षय विलास भादरपूरकर, याने जून २०२० मध्ये याची घोषणा केली होती आणि तब्बल एका वर्षाहून अधिक चातका सारखे ताटकळत बसलेल्या प्रेक्षकांना ३१ ऑगस्टला त्यांच्या धीराचे फळ मिळाले. सिनेसृष्टीत 'बबली' या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या हस्ते ३१ ऑगस्टला याचा लाँचिंग इव्हेंट पार पडला. जवळ जवळ संपूर्ण मराठी सिनेसृष्टी त्या वेळेस तिथे उपस्थित होती. 

सगळ्याच मराठी रसिकांसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. कारण प्लॅनेट मराठी हे पहिले OTT प्लॅटफॉर्म आहे ज्यावर फक्त आणि फक्त मराठी कन्टेन्ट उपलब्ध असले. जुने मराठी चित्रपट, नवीन चित्रपट आणि प्रामुख्याने ज्याने सगळ्यांचे लक्षवेधले ते म्हणजे मराठी वेब सिरीज सुद्धा प्रेक्षांना प्लॅनेट मराठीवर बघता येईल. 

तर चला, प्लॅनेट मराठीवर दाखवलेल्या काही चित्रपटांची आणि वेब सीरिजची नावे आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया.

 

  • बाप बीप बाप!

Source: imagekit

दिग्दर्शक - अमित कान्हेरे

लेखक - प्रतीक व्यास

संगीत - रोहन गोखले आणि रोहन प्रधान

कलाकार - पर्ण पेठे, अमोल बंडे, शरद पोंगशे, उदय नेने, तेजस बर्वे, तारका पेडणेकर, शिल्पा तुलस्कार आणि इतर सह कलाकार.

आई आणि मुलगा, वडील आणि मुलगी या विषयांवर जरी बरेच चित्रपट असले तरी बाप आणि मुलगा अश्या सवेंदनशील विषयावर कदाचित पहिल्यांदाच वेब सिरीजच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. वडील किती ही मवाळ स्वभावाचे असले तरी थोड्या प्रमाणात का होईना पण त्यांची आदरदायक भीती असतेच. एखादी वेळेस मुलीशी बोलताना वडील जरा सौम्यतेने बोलतील पण मुलाशी बोलतांना आवाजत जरा कठोरता असते. 

त्यामुळे वडील आणि मुलामध्ये प्रेमाचे संवाद होतातच असे नाही. प्रेमाचे संवाद नाहीत म्हणजे मुळात प्रेमच नाही, असे नाही. पण प्रत्येक बापलेकाच्या नात्यात ते व्यक्त करता येणं, हे जरा अवघड काम असतं आणि यामुळे कधी कधी आयुष्य उलटून जातं पण वडील मुलाला आणि मुलगा वडिलांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगतच नाही. अश्या दुर्ज्ञेय विषयाला हात घालणारी ही मराठीतली पहिलीच वेब सिरीज.

 

  • हिंग पुस्तक तलवार

Source:imagekit

दिग्दर्शक - निपुण धर्माधकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे आणि मकरंद शिंदे

लेखक - ओंकार रेगे आणि तन्मय कानिटकर

संगीत - सारंग

कलाकार - आलोक राजवाडे, सुशांत घाडगे, नील साळेकर, क्षितिश दाते, शौनक चांदोरकर, केतकी कुलकर्णी मानसी भवाळकर आणि इतर सह कलाकार

हिंग पुस्तक तलवार, हे नाव ऐकताच प्रत्येकांच्या मनात उत्सुकुता निर्माण होते. एवढा प्रचंड मोठा स्टार कास्ट असतांना आणि ४ तरुण आणि अनुभवी दिग्दर्शकांची मांदियाळी असतांना, रसिक प्रेक्षकांना त्यांचा धीराचा बांध सांभाळणं कठीण होत होते. परंतु ३१ ऑगस्टलाच OTT प्लॅटफॉर्मच्या लाँच सोबतच ही वेब सिरीज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली.  

कथेच्या कथानकाचा विचार केला तर, ही वेब सिरीज सात मित्रांच्या जीवनावर आधारित आहे जे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात आणि तारुण्याच्या काळात त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल चर्चा करतात. थोडक्यात, कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे कारण ते संघर्ष करताना त्यांना जे काही अनुभव आले, हे सगळे अनुभव ते एकमेकांसोबत वाटतात आणि एक प्रेक्षक म्हणून देखील ते सगळे अनुभव ऐकायला मजा येते पण थोडा आश्चर्य देखील वाटतं. एखाद्या चंद्रकोर प्रमाणे, प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होईल या बाबतीतली उत्सुकता अजून अजून वाढतच जाते.   • जॉबलेस

Source: imagekit

दिग्दर्शक - निरंजन पत्की

लेखक - अमित बैचे

संगीत - केदार दिवेकर

कलाकार - सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री,  स्वप्नील पाटील, हरीश दुधाडे, मयुरी वाघ, सिद्धेश्वर झाडबुके, राधा धरणे, रमेश परदेशी, शिवराज वाळवेकर, मयूर पवार, अंबरीश देशपांडे, अक्षता गायकवाड आणि इतर सह कलाकार.

हिंदी सिनेमा मधील एका चित्रपटातला एक डायलॉग आहे, "किस्मत बड़ी कुत्ती चीज़ है... साली कभी भी पलट सकती है." साधारणतः याच विषयावर आधारित ही वेब सिरीज आहे. अर्थातच याच बरोबरीने अजुन बऱ्याच विषयांना सुद्धा या वेब सीरीजने हात घातला आहे. अंगावर सरसरून काटा आणणारी आणि समाजाला आरसा दाखवणारी अशी ही वेब सिरीज आहे.

खोट्या आरोपामुळे आपली नोकरी गमावलेल्या तरुणाची ही कहाणी आहे. पण फक्त नोकरी गमावण्या पर्यंत हे थांबत नाही. या घटनेमुळे त्याच्या आयुष्यात अजून काय काय बदल घडलेत, त्याला कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरी जावं लागलं आणि या सगळ्या गोंधळात तो आयुष्यात चुकीचा मार्ग निवडतो की त्याच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर येते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या वेब सिरीज मध्ये दडली आहे. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण वाचून झाल्या नंतर क्षणाचाही विलंब न करता तुम्ही या रंजक वेब सिरीजचा आस्वाद घेऊ शकता.  • सोप्पं नसतं काही

Source: imagekit

दिग्दर्शक - मयुरेश जोशी

लेखक - मयुरेश जोशी

संगीत - मयुरेश जोशी

कलाकार - शशांक केतकर, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर, प्रदीप वैद्य, रुपाली सुरेश वैद्य आणि इतर सह कलाकार

नावा प्रमाणेच, ह्या सिरीजला समजणं, "सोप्पं नसतं काही." मृण्मयी देशपांडे जिने "अनुजा" नावाची भूमिका निभावली आणि शशांक केतकर ज्याने "सुमीत" नावाची भूमिका वठवली आहे, अगदी सुरुवातीला या दोघांचं लग्न ठरतं,  त्यांच्या आई वडिलांची सुद्धा परवानगी असते. पण लग्न होण्या आधीच सुमितचे यकृत निकामी (liver fail) होतं. ज्यामुळे त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ येते. परंतु ते करून सुद्धा त्याच्या जगण्याची काही फार शक्यता नसते. 

म्हणून सुमित जबरदस्तीने अनुजाशी ब्रेकअप करतो जेणे करून तो शांत पणे आपले प्राण त्यागू शकेल. जड अंतःकरणाने ती त्याच्या सोबत ब्रेकअप करते आणि तिच्या आयुष्यात "समीर" येतो जी भूमिका अभिजीत खांडकेकर ने साकारली आहे. 'नवरा' नावाच्या व्यक्तीसाठी जर कोणी मापदंड दिलेत तर समीर त्यात अगदी १००% उतरेल. त्यामुळे समीर आणि अनुजा या दोघांचा संसार अगदी व्यवस्थित चालू असतो. पण अनुजाच्या मनातून सुमीत गेलेला नसतो. आणि सगळं अगदी व्यवस्थित चालू असतांना एक दिवस अचानक सुमीतचा भूतकाळ यांचा संसाराचा दरवाजा ठोठावते. इथून कथेत वळण येतं...  • परीस

Source: imagekit

दिग्दर्शक - मयूर करंबळीकर

लेखक - मयूर करंबळीकर

संगीत - निरंजन पेडगावकर

कलाकार - अविनाश खेडेकर,विशाल सांगळे, अश्विनकुमार अणेगिरीकर, चंद्रकांत राऊत, गायत्री बनसोडे, पायल जाधव, कुलदीप दगडे आणि इतर सह कलाकार. 

'विश्वास' ही गोष्ट माणसाच्या आयुष्यात फार महत्वाची आहे आणि विश्वास हा फक्त माणसावरच असू शकतो असे मुळीच नाही. माणूस, एखादी वस्तू, एखादी वास्तू किंवा एखादी प्रथा या पैकी कुठल्याही गोष्टीवर आपला विश्वास असू शकतो. पण विश्वास ठेवण्याची पण एक गंमत आहे. 

ज्याप्रमाणे योग्य माणसावर ठेवलेला विश्वास हा नेहेमी सार्थक ठरतो आणि याच्याच विपरीत अयोग्य किंवा चुकीच्या माणसावर ठेवलेला विश्वास एखाद्या व्यक्तीला घेऊन बुडू शकतो. याचप्रमाणे एखाद्या अयोग्य आणि चुकीच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला की माणूस कुठल्या स्थराला जाऊ शकतो याचं उदहारण म्हणजे परीस ही वेब सिरीज. अत्यंत रंजक आणि आपल्या विचारांना पीळ देणारी ही वेब सिरीज आहे.  •  जून

Source: imagekit

दिग्दर्शक - सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती

लेखक - निखिल महाजन

संगीत - शाल्मली खोलगडे

कलाकार - सिद्दार्थ मेनन, नेहा पेंडसे, किरण करमरकर, निलेश दिवेकर, जितेंद्र जोशी, संस्कृती बालगुडे, सौरभ पचौरी, स्नेहा रायकर, रेशमी श्रीवर्धन आणि इतर सह कलाकार.

माणसाने अनुभव ऐकावे तर हारलेल्या व्यक्तींचे. कारण आयुष्यात काय करावं या पेक्षा काय करू नये हे अधिक महत्वाचं आहे. आणि काय करू नये हे आपल्याला एखादा हरलेला त्याच्या अनुभवातून सांगू शकतो. एखाद्या शर्यतीत पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य संपलं का? मुळीच नाही. पण बरीच लोक ही गफलत करून बसतात. एका लहानश्या चुकीमुळे, लहानश्या पराभवाला आपल्या आयुष्याची हार समजतात आणि मनातल्या मनात कुढत बसतात. अश्याच दोन व्यक्तींची ही कथा आहे.

नेहा (जी भूमिका नेहा पेंडसे हिने वठवली आहे), ती बॅग पॅक करून औरंगाबादला तिच्या सासरी जाते जिथे तिला नील भेटतो. शहरात पोहचल्यावर, ती नील (जी भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे) ला भेटते. तिच्या सासरी जाण्यासाठी तिला पत्ता ठाऊक नसतो म्हणून ती नीलला पत्ता विचारते आणि अश्याच संवादातून त्यांची ओळख होते. नील त्याच्या इंजिनीयरिंगच्या परीक्षेत नापास होतो, ज्यामुळे त्याला रोज त्याच्या घरच्यांचे टोमणे ऐकावे लागतात ज्याला तो कंटाळून गेला असतो. नेहाच्या आयुष्यात सुद्धा बऱ्याच अडचणी असतात आणि एक वेळ अशी सुद्धा येते जेव्हा ती आपलं आयुष्य संपवायचा निर्णय करते. अशाप्रकारे दोन तुटलेल्या आणि विखुरलेल्या माणसांचा प्रवास एकमेकांना स्वीकार करण्याच्या आणि सुधारण्याच्या मार्गावर सुरू होतो.

 

या ५ वेब सिरीज आणि १ सिनेमा या व्यतिरिक्त सुद्धा प्लॅनेट मराठी OTT वर तुम्ही अजून बराच कन्टेन्ट बघू शकता. दगडी चाळ, नटसम्राट, बालगंधर्व, देऊळ, एक उनाड दिवस, शाळा आणि अजून बरेच सिनेमे त्या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त काही टॉक शो सुद्धा उपलब्ध आहे आणि "चेरी ऑन द केक" म्हंटलं तर या सगळ्या सोबत काही गाण्याचे कॉन्सर्ट्स सुद्धा उपलब्ध आहे आणि हे सगळं फक्त ३६५ रुपये वर्ष या किमतीत. सध्या आपण सगळे आपापल्या घरी आहोत आणि घरी तुमच्या मनोरंजना करिता ही यादी तुमच्या कामात येईल आणि यात नमूद केलेले सर्व सिनेमे आणि वेब सिरीज तुम्हाला आवडतील ही आशा!
image-description
report Report this post