मसालेदार पनीर कॉर्न भुर्जी

3 minute
Read
2021-06-04 15:13:07.179978

(You can read this blog in English here.)

लहानमुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना आवडणारा भाजीतला प्रकार म्हणजे ‘’पनीर’’……क्वचितच अशी व्यक्ती असेल जी पनीर आवडीने खात नसेल. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. चावायचा त्रास नाही असं हे मऊसूत पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये शिजवलं की खूप मस्त लागतं. हॉटेलमध्ये गेलो की आवर्जून पनीरची डीश ऑर्डर केली जाते. आपल्याकडील लग्नसमारंभात किंवा शुभ कार्यात पनीरचे पदार्थ खूप प्रसिद्ध आहे पण आपण पारंपरिक ग्रेव्ही पनीर किंवा चायनीज पनीर पदार्थांपासून थोडसं दूर जातं भुर्जी ट्राय केली तर? पण या भुर्जीमध्येही आहे मसालेदार ट्विस्ट ! पनीरमध्ये मक्याचे दाणे घालून अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. तेव्हा आता जास्तवेळ न घालवता चला तयार करूया ''पनीर कॉर्न भुर्जी'' !!!

रेसिपीसाठी लागणारा वेळ – ८ ते १० मिनिटे

साहित्य

पनीर- २०० ग्रॅम

कांदा (मध्यम आकार)- १

मक्याचे दाणे (वाफवलेले) - १०० ग्रॅम्स

हिरवी मिरची - २

तूप / तेल- १ चमचा

लाल मिरची पावडर- १/२ चमचा

गरम मसाला- १/४ चमचा

धणे पूड - १/२ चमचा

हळद पावडर - १/४ चमचा

कसूरी मेथी (कुस्करून)- १/४ चमचा

चवीनुसार मीठ

कृती

१. कांदा आणि हिरवी मिरचीचे लहान तुकडे करा.

२. गॅसवर एक पॅन ठेवा त्यात तूप घाला.

३. तूप गरम झाल्यावर त्यात कांदा आणि हिरवी मिरची घाला आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या.

४. आता मक्याचे दाणे घाला आणि मध्यम आचेवर एक मिनिटभर शिजू द्या.

५. पनीर कुस्करून घ्या.

६. कुस्करलेलं पनीर कढईत टाका आणि सर्वकाही नीट मिक्स करून २ मिनिटांपर्यंत शिजू द्या.

७. शेवटी कसूरी मेथी वगळून सर्व मसाले घाला आणि छानपैकी मिक्स करा.

८. मध्यम आचेवर १-२ मिनिटे शिजू द्या जेणेकरून पनीरमध्ये मसल्याची चव छान लागेल.

९. आता गॅस बंद करा आणि पनीर कॉर्न भुर्जी अधिक स्वादिष्ट होण्यासाठी कसूरी मेथी घाला.

तुमची सुपर यमी पनीर कॉर्न भुर्जी तयार आहे ! अतिशय चवदार,कमी वेळात तयार होणारी ही पाककृती असून भाकरी, रोटी अगदी कुल्चासह तिचा आस्वाद आपण घेवू शकतो. आम्हाला आशा आहे पनीरची ही वेगळी पाककृती तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्ही करून पहा आणि आम्हाला खालील कमेंट सेक्शनमध्ये तुमची मते कळवा. तुम्ही आम्हाला इन्स्टाग्रामवर #girlsbuzzindia देखील टॅग करू शकता.

 

image-description
report Report this post