स्त्री-शिक्षण म्हणजे समाज आणि देशाचा विकास

10 minute
Read

Highlights शिक्षण म्हणजे साक्षरता,व्यक्तिमत्व विकास घडवण्याची सुवर्ण संधि, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे महत्वाचे साधन, डोळसपणे समाजात वावरण्याची एक अनोखी जबाबदारी, विचारांमधील चांगले वाईट बदल म्हणजे शिक्षण प्रणाली. आणि हे सर्व प्राप्त करून व्यक्तीला साक्षर किंवा शिक्षित म्हटले जाते. या शिक्षणाचा कोणी अनुभव घ्यावा किंवा कोणी नाही हे कुठेही मांडलेले नाही. स्त्रीने शिक्षित असणे म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण करून देणे. त्याकरता तिने नोकरी करून आपली ओळख करून द्यायला हवे असे काही नाही. तिचे विचार, तिचे स्वप्न, तिचे व्यक्तिमत्व यावर ती स्वतःला सिद्ध करू शकते.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

भारतात स्त्रीने शिकणे गृहीत मानले जात नव्हते. स्त्रियांवर शिक्षणाच्या बाबतीत अनेक अन्याय केले गेले. त्यात स्त्री आणि पुरुषांचे शिक्षणही वेगळे असावे, असाही एक वाद घालण्यात आला. स्त्रियांना बालसंगोपन, गृहव्यवस्थापन आणि पाककौशल्याचे शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून त्या उत्तम पत्नी, सुमाता आणि आदर्श गृहिणी होऊ शकतील. याशिवाय वेगळ्या शिक्षणाची गरज कशाला? शेवटी बायकांना चूल आणि मूलच तर सांभाळायचं आहे,अशी धोरण त्यांची बांधली गेली होती.यातून बाहेर पडण्यासाठी खूप कमी पुरुष मंडळींनी आपला पाठिंबा देऊन स्त्री शिकली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष दिले. त्यात प्रामुख्याने गोपळराव जोशी, ज्योतीराव फुले, न्यायमूर्ती महादेव रानडे यांची नावे घ्यावीशी वाटतात. यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री ही हक्काने ,न्यायाने आणि अभिमानाने शिक्षण घेऊ शकते.

स्त्रीशिक्षणाचं महत्त्व ज्योतिबा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी ओळखलं होतं. १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली, आपल्या पत्नीला, सावित्रीबाईंना सुशिक्षित करून त्यांना ती चालवायला दिली.  शिक्षण हे ना वयापुरता मर्यादित आहे, ना स्त्री पुरुष या लिंग भेदभावापुरते. शिक्षणामुळे महिला साक्षर आणि सुज्ञ झाल्या. पूर्वीच्या काळापासून जो एक पायंडा रोवला गेला होता की, स्त्रीने घर सांभाळावे आणि पुरुषाने बाहेरील काम करून घर चालवावे, तो स्त्रियांच्या शिक्षण चळवळीमुळे मोडीत काढला गेला. महिलांच्या शिक्षित असण्याने त्यांना प्रश्न विचारण्याची संधि मिळू लागली. समाजातील घडामोडी कळण्याकरता शिक्षण हाताशी असणे तेवढेच महत्वाचे ठरू लागले. भारतात १९७५ नंतर स्त्री संघटनांच्या कृतिशील चळवळींना प्रारंभ झाला.

स्त्री ही ह्या पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर निर्मिती आहे असं म्हटलं की ते फक्त तिच्या शारीरिक सौंदर्याविषयी बोललं जात आहे असा गैरसमज साधारणपणे नेहमीच केला जातो. स्त्रीच्या शरीरापेक्षा सुद्धा वेगळं असं काही तिच्या आत खोल काहीतरी दडलेलं असतं याचा थांगपत्ता अनेकांना लागत नाही. वर्षोनुवर्षे ज्या स्त्री सोबत पुरुष एकाच घरात राहतो त्या स्त्रीच्या मनात, बुद्धीत नेमकं काय चाललेलं असतं हे समजून घेणं त्याला जमत नाही. त्या स्त्रीमुळे घरात किती सकारात्मक बदल होतात याकडे लक्ष न देता तिने का शिकाव? शिकून पुढे तिला काय करायचे? आपल्याकडे स्त्रिया घराबाहेर पडत नाही, असे सांगून तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जाते.

स्त्रीसाठी शिक्षण का महत्वाचे असायला हवे?  असा  प्रश्न पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अनेकांना पडत असावा. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही की, जर घरातील पुरुषाला शिक्षणाची संधि मिळाली तर कुटुंबाला त्याचा फक्त आर्थिक लाभ होतो मात्र, त्याच घरातील स्त्रीचं शिकलेली नसेल, तिला लिहिता वाचता येत नसेल तर त्याचे नुकसान हे त्या स्त्री बरोबर इतर सदस्यांचे देखील होईल यात शंकाच नाही. आणि त्या स्त्रीला जर शिक्षणाची संधि मिळाली तर तिच्या बरोबर संपूर्ण कुटुंब शिक्षित होईल. आणि त्याचा फायदा त्या स्त्री बरोबर कुटुंबातील इतर सदस्यांना देखील होईल. यांसाठीच स्त्रियांचे शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. भारतातील शिक्षित स्त्री ही नव्या काळाची नितांत गरज आहे. स्त्री शिकलीच नाही, ती साक्षरच झाली नाही तर आपण विकसित देशाची अपेक्षा सत्यात उतारू शकत नाही.

शिक्षण म्हणजे नेमके काय? शिक्षण म्हणजे साक्षरता. व्यक्तिमत्व विकास घडवण्याची सुवर्ण संधि, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे महत्वाचे साधन, डोळसपणे समाजात वावरण्याची एक अनोखी जबाबदारी, विचारांमधील चांगले वाईट बदल म्हणजे शिक्षण प्रणाली. आणि हे सर्व प्राप्त करून व्यक्तीला साक्षर किंवा शिक्षित म्हटले जाते. या शिक्षणाचा कोणी अनुभव घ्यावा किंवा कोणी नाही हे कुठेही मांडलेले नाही. स्त्रीने शिक्षित असणे म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण करून देणे.  त्याकरता तिने नोकरी करून आपली ओळख करून द्यायला हवे असे काही नाही. तिचे विचार, तिचे स्वप्न, तिचे व्यक्तिमत्व यावर ती स्वतःला सिद्ध करू शकते.

महिला शिक्षण

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदु असते. घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी म्हणून तिचा स्वीकार केला जातो. तुम्ही शिकलेल्या असाल, तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही नोकरी करत नसलात तरीही कोणत्या घटनांचा कशावर कसा प्रभाव होतो आहे, कुठे काय चालले आहे  हे सहज ओळखता येईल. स्त्रीला घरकाम करत असतांना त्याला जोड हवी ती साक्षरतेची. स्त्री ही फक्त ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेवर आधारित व्यक्तिमत्व नसून ती साक्षरतेची प्रतिमा बनली आहे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. 

स्त्री साठी शिक्षित असण्याचे महत्व म्हणजे आपण योग्य व्यवहार करू शकतो. शिक्षित असल्यामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तयार होतो. आपले विचार प्रगल्भ होतात. तसेच घरात होणाऱ्या व्यवहाराची पडताळणी करता येते. योग्य हवा तसा खर्च आणि त्यातून कसा नफा होऊ शकतो याकडे विशेष लक्ष देता येते. हे सकारात्मकतेच्या दृष्टीकोणातून बघितले असता आपल्याला या गोष्टींची नक्कीच जाणीव होते की, जर आपण शिकलेलो आहोत, मात्र आपल्याकडे नोकरी नाही म्हणून आपण काहीच करू शकत नाही असे नाही. तर त्याउलट आपण साक्षर असल्याचा आनंद उराशी बाळगून त्याचा फायदा करत आहोत. जरी नोकरी करून पैसे कमवू शकत नसलो, तरी आहे त्या पैशांचा योग्य त्या ठिकाणी वापर करून त्यात नफा कसा मिळेल याकडे आवर्जून लक्ष दिले जाते. शिकलेल्या स्त्रिया आपल्या मुलांकडे जास्त जागरूक असतात. त्यांच्याबाबतीत त्या विशेष लक्ष देऊन असतात. हे मात्र तितकेच सकारात्मक आहे. सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते

स्त्री ही एक मुलगी,बहीण,पत्नी,आणि आई अशा आयुष्यभरत बऱ्याच पात्रांची भूमिक बजावत  असते. कोणत्याही नात्यात सामील होण्यापूर्वी प्रथम ती स्वातंत्र्य देशाची नागरिक असून तिच्याकडे मनुष्यासारखे सर्व हक्क प्रदान केलेले आहे. जीवन प्रवासतील सर्व क्षेत्रांमध्ये अधिक चांगले कार्य आणि कामगिरी मिळविण्यासाठी योग्य शिक्षण मिळवण्याचे अधिकार आहेत. स्त्रिया शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात अधिक सक्षम आणि कणखर बनतात. शिक्षणामुळे त्यांचे मन परिवर्तन होते. नव्या जगाची ओळख त्यांना होते. शिक्षित असलेल्या स्त्रिया त्यांच्या कर्तव्ये आणि हक्कानंबद्दल जागरूक असतात. तसेच पुरुषांप्रमाणे देशाच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी जबाबदऱ्या स्वीकारण्यास स्त्रियांची  मदत होईल.

आजच्या इंटरनेटच्या युगात तर अनेक महिला घरी बसून सर्व खरेदी, मुलांचे शिक्षण, तसेच घरगुती व्यवहार करायला शिकल्या आहेत. हे सगळे शक्य झाले ते फक्त शिक्षणामुळे. शिक्षण फक्त नोकरी करण्याच्या उद्देशाने घ्यायचे नसून आपण प्रगतिशील आणि आत्मनिर्भर बनले पाहिजे,म्हणून घ्यायला हवे. शिक्षित असणे म्हणजे जीवनाचा एक नवा मार्ग अवलंबणे. स्त्रिया ह्या खरंतर मल्टीटास्किंग करणाऱ्या असतात. स्त्री एकावेळी घरातील कामे, मुलांकडे लक्ष्य देणे, घर सांभाळणे , एक उत्तम अशी जबाबदारी  पेलणे, आणि त्यात ती स्वतःला काय हवे, काय नको त्याकडे लक्ष देते. अशी अनेक कामे एकाच वेळी एक स्त्री करत असते. आणि यात तिला पुढे जाण्याकरता जोड हवी ती फक्त शिक्षणाची.  जेव्हा स्त्री शिकते तेव्हा ती जे शिकली त्यात अजून तिचे स्वतःचे मुद्दे मांडून त्यापासून नवीन काहीतरी ती तयार करते. तिच्या शिकण्याने सगळ्याच बाबतीत बदल घडतो. जरी शिक्षाण घेतले आणि नोकरी नाही करता आली तरी तिचे स्वप्न ती तिच्या मुलांकडून पूर्ण करू शकते. मात्र ते स्वप्न पाहण्याकरता तिला शिकायला हवे.

नोकरी केली म्हणजे सर्व काही बदलते असे नाही. जरी स्त्रीने नोकरी केली तरी तिच्या कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षांमध्ये फारसा फरक पडत नाही. नोकरी करूच नये असे म्हणणे योग्य देखील नाही. पण, जर काही परिहार्यस्तव नोकरी करणे कठीण होऊन बसत असेल, तर अशावेळी त्या स्त्री ने आपण शिक्षित आहोत आणि त्यात मी आनंदी आहे या वाक्याची पुनरावृत्ती मनात केली पाहिजे. त्यामुळे आपण नोकरी न करण्याचा खेद आपल्या मनात न राहता आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीच्या नव्या उमेदीला चालना दिली पाहिजे. नवा उत्साह, नवे धोरण घेऊन प्रत्येक स्त्रीने आपली ओळख निर्माण केली पाहिजे. आपण नोकरी करत नसलात तरीही स्त्रीसाठी शिक्षित होणे महत्वाचे आहे. जोपर्यंत स्त्रिया साक्षर, सुशिक्षित होत नाहीत, तोपर्यंत समज निकोप होणार नाही. कारण अज्ञानातून अंधश्रद्धा, अविवेक या गोष्टी येतात. म्ह्णूनच जोतीराव फुले सांगतात की, ‘विद्येविना सर्व काही व्यर्थ आहे’, म्हणजेच त्या स्त्रीने घर सांभाळले, मूल मोठी केली, कुटुंबाकडे बघितले, मात्र ती शिकलीच नाही तर तिचा काहीच अर्थ नाही.

आज संपूर्ण जगात स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावली आहे. जेव्हा अनेक क्षेत्रात स्त्रिया नाव काढतात तेव्हा प्रत्येक स्त्री-पुरुषाला त्यांचा अभिमान वाटतो, त्यांच्याबद्दल नाव घेतांना आदर वाटतो. मग तितकाच आदार आपल्या घरातील स्त्रियांकरीता ते जेव्हा व्यक्त करतील, तेव्हा प्रत्येक घरातील स्त्री अभिमानाच्या आणि आत्मसन्मानाच्या खऱ्या दागिन्याने मढून जाईल. ज्या घरात कन्यारत्न जन्म घेईल त्या कुटुंबातील सदस्य म्हणतील मुलगी झाली, लक्ष्मी आली!

मुलगी शिकली , प्रगती झाली ! मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण !

यावर मला प्रत्येक स्त्री करता एव्हढेच म्हणावेसे वाटते की,

स्वतःच्या अस्तित्वाचा एक तरी दिवस तू स्वतः साजरा कर,

तुझ्या प्रगतीचा, उन्नतीचा प्रत्येक क्षण खास कर.

घे उंच भरारी शिक्षणाची,

अभिमानाने मान उंच कर देशाची.

तू आई, तू बहीण, तू पत्नी, तू मुलगी,

प्रयत्नाना लाभलेली तूच खरी उन्नती.

पुन्हा मागे फिरू नको,

साक्षरतेचा धडा गिरवल्याशिवाय आता मात्र तू थांबू नको.

सृष्टितील स्त्री तत्वाला सलाम!

 

Logged in user's profile picture