लग्नाची खरेदी या ५ ठिकाणी करा !!

10 minute
Read

Highlights 'लग्न' ठरलं की सर्वात महत्त्चाची गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे 'खरेदी'. लग्नाचा बस्ता हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो. वधु-वरापासून सगळ्या नातेवाईकांपर्यंत सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते. पेहरावापासून चपलांपर्यंतची खरेदी करताना नक्की कुठे जायचं ते कळत नाही. म्हणूनच आम्ही घेवून आलो आहोत महाराष्ट्रातील अशी पाच ठिकाणं जिथे लग्नासाठीचे शॉपिंग म्हणजे वन स्टॉप डेस्टिनेशन असंच म्हणायला हवे. कोणती आहेत ती ठिकाणे चला पाहूया.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

लग्न ठरल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘लग्नाचे शॉपिंग’. प्रत्येक वधू आणि वराच्या लग्नसोहळ्यातील लुक आणि इतर गोष्टींबाबत खास कल्पना असतात. सध्या तर तीन-चार दिवशी लग्नसोहळा रंगतो. साखडपुडा, मेंदी, हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचं रिसेप्शन, पुजा अशा अनेक कार्यंक्रमांसाठी निरनिराळे पेहराव आणि दागिने परिधान केले जातात. वधू आणि वर या सर्व सोहळ्यात सेंटर ऑफ एटरॅक्शन असल्यामुळे त्यांचा लुक सर्वाधिक आकर्षक असणे गरजेचे आहे.लग्नाची खरेदी म्हटली की प्रामुख्याने येवला, कोल्हापूर, नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्रामुख्याने खरेदी केली जाते.

येवला 

आता लग्न म्हटलं की भरजरी साडी डोळ्यासमोर येते.लग्नात भरपूर साड्यांची खरेदी होते म्हणजे वधूसोबत सगळ्यां नातेवाईकांसाठी साडीची खरेदी केली जाते. आता साडीचे अनेक प्रकार आहेत त्यातील काय घेवू आणि काय नको असं होतं. सध्या लग्नसमारंभात पारंपरिकतेचा ट्रेन्ड जास्त आहे. आता पारंपरिक म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते 'पैठणी'. पैठणीची खरेदी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करु शकता पण अस्सल पैठणी घ्यायची तर 'येवला' येथे जायला हवे. सातासमुद्रापार येवल्याच्या पैठणीची ख्याती आहे. आजच्या तारखेतही हातमागावर येवल्याला पैठणी तयार होतात. खऱ्या पैठणीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते. बॉर्डर आणि पदरही. तसंच खऱ्या पैठणीची जर कधीही काळी पडत नाही. दहा हजारापासून या पैठणीची किंमत सुरू होते. ब्रोकेड,कॉटन, खण, बनारसी, हँडलूम सिल्क, पेशवाई, डिझाईनर, महाराणी, सेमी, भरजरी पल्लू, प्युअर सिल्क, मल्टीकलर अशा प्रकारातील अस्सल पैठणीच्या खरेदीसाठी नाशिकमधील येवला येथे जायला हवे. लग्न लागताना महाराष्ट्रीयन मुली नऊवारी साडी नेसतात. नऊवारी पैठणीसुद्धा मिळते त्यात साजेसे दागिने घातले की झालं नवरी नटली…मानपानासाठी साड्यांची खरेदी तुम्ही येवल्यात करु शकता. तुमच्या बजेटनुसार पैठणी अथवा सेमी पैठणीचा पर्याय तुमच्याकडे असतो.

कोल्हापूर 

कोल्हापूर 

लग्नातील पेहरावासोबत महत्त्वाचे आहेत 'दागिने'. आता सोन्याचे दागिने आपण आपल्या सोनाराकडून तयार करुन घेतो. मात्र पेहरावानुसार दागिने घालताना मोती, हिरे किंवा गोल्ड प्लेटेड दागिने घातले जातात. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने घ्यायचे असतील तर 'कोल्हापूर'ला जायला हवं. 'कोल्हापूरी साज' आज महाराष्ट्राची प्रत्येक वधू हे दागिने आवडीने मिरवते. कोल्हापुरी साजला महाराष्ट्रीय महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. राजघराण्यातील विवाहित स्त्रीया हा दागिना घालयच्या. सध्या लग्नात वधू कोल्हापूरी साज आवर्जून घालते. कोल्हापुरात तुम्हाला ठुशी, मोहनमाळ,लक्ष्मी हार, राणी हार, अंबाड्याला लावायला केसांची पिन, वाकी म्हणजे हाताचा दागिना, वेगवेगळया प्रकारातील नथ तुम्ही खरेदी करु शकता. हे सगळे दागिने अतिशय सुंदर आणि आपल्या पाकिटाला परवडणारे असतात. आता कोल्हापुरात आहात तर 'कोल्हापुरी चप्पल' घ्या. सध्या कोल्हापुरी चप्पलमध्ये फ्युजन प्रकार पहायला मिळतात. वधुच्या नऊवारी साडीवर किंवा भरजरी शालूवर पारंपरिक कोल्हापूरी चप्पल छान दिसते. वरासाठी खरेदी करताना चप्पल,बूट यांचा विचार केला जातो. शेरवानी किंवा धोतर नेसल्यावर कोल्हापूरी चप्पल छान दिसते.कोल्हापुरातील महाद्वार रोडला अस्सल कोल्हापुरी चप्पलांची खरेदी करता येते. शिवाजी रोड, ताराराणी रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, स्टेशन रोडसह विविध भागातील कपड्यांच्या दुकानात नक्की जा. पारंपरिक खण आणि इरकली साड्या ज्या लग्नानंतरच्या समारंभासाठी तुम्ही घेवू शकता.

कोल्हापूरमधील खरेदीसाठी खालील व्हिडीओ नक्की पाहा

लग्नात नवरदेव फेटा घालतो. आता रेडीमेड फेटा असेल तर फेटा घालतो नाहीतर फेटा बांधला जातो. कोल्हापुरातील फेटे प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरात फेट्यासाठी खास केशरी रंगाचं कापड मिळतं. तसेच तुम्हाला हवे तसे रेडीमेड फेटेसुद्धा मिळतात. अस्सल मराठमोळा फेटा बांधण्याची खास स्टाईल आहे म्हणून काही लग्नसमारंभात खास फेटा बांधायला माणसं येतात. वधु किंवा वराकडील मंडळींना एकसारखे फेटे हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही कोल्हापुरातून खरेदी करु शकता. 

नागपूर 

नागपुरात लग्नाच्या खरेदीसाठी गेलात तर कपडे, दागदागिने यांची खरेदी करा. नागपुरात काही जुन्या बाजारपेठा आहेत जिथे मस्त खरेदी होवू शकते. महल इतवारी मार्केट, सिताबर्डी मार्केट आणि गांधी मार्केट येथे पेहरावापासून फूटवेअरपर्यंत अनेक गोष्टींची खरेदी करु शकता. पुनम मॉल, सेंट्रल मॉल, इंटरनिर्टी मॉल,मिलेनिअम शॉपिंग मॉल, इंप्रेस सिटी मॉल किंवा अपना बाझार येथेही लग्नाचा बस्ता उत्तम मिळू शकतो. लग्नासाठी खास दागिने घ्यायचे असतील तर धरमपेठ मार्केट रोड, सराफा बाजार आणि अलंकार मार्केट उत्तम पर्याय आहेत.

लग्नासाठी पारंपरिक दागिने,

पुणे  

मराठमोळं आणि टिपीकल मराठी लग्न म्हटल्यावर डोळ्यासमोर येते 'पुणेरी पगडी' आणि पारंपरिक वस्त्रांनी सजलेले वर-वधू. तेव्हा लग्नाच्या खरेदीसाठी 'पुणे' हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला पारंपरिक दागिने, लग्नासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी जसं पुणेरी पगडी, सोवळं, रूखवताच्या गोष्टी आणि नऊवारी साड्या यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध होते. पुण्यात काही दुकान आहेत जी वर-वधू दोघांच्याही शॉपिंगसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन अशी आहेत त्यात पेशवाई क्रिएशन, गलानी फॅशन्स, कासट, कजरी सारीज, वामा, स्वामिनी साडी सेंटर अशा अनेक दुकानांचा समावेश आहे. येथे पारंपरिक साडी पासून जरी वर्कचे रिच लेहेंगा सगळ्या प्रकारातील कपडे मिळतात. वधु- वर एकत्र खरेदीसाठी आले तरी उत्तम शेवटी काय पुणे तिथे काय उणे..अगदी तसेच….दागिन्यांच्या खरेदीसाठी पु.ना.गाडगीळ, नानासाहेब विट्टुल शामसेट ज्वेलर्स ही दुकानं ब्रिटीशांच्या काळापासून आहेत तिथे पारंपरिकतेसोबत फॅशनेबल ट्रेन्ड नक्की मिळेल. पुण्यात ज्वेल पॅरडाईज म्हणून दागिन्यांचे दुकान आहे तिथे लग्नातील ज्वेलरी भाड्याने दिली जाते. स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी भेट द्यायला हवी पुण्यामधील 'तुळशीबागेला'. रुखवातासाठी लागणाऱ्या गोष्टी किंवा पाहुण्याचे गिफ्ट तुम्ही येथे खरेदी करू शकता.

मुंबई 

लग्नसोहळा आणि खरेदी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता खरेदी म्हटलं की डोळ्यासमोर येते आमची 'मुंबई'. लग्नामधील खरेदीसाठी मुंबईकरांचं हक्काचं ठिकाण म्हणजे 'दादर'. तुम्ही कधीही जा दादरला हमखास गर्दी असते. दादरमध्ये लग्नाची एटूझेड खरेदी होते. दादर पूर्वेकडे असणारे 'हिंदमाता' हे तर खरेदीचे हक्काचे ठिकाण म्हणायला हवे. दादर फुल मार्केटमध्ये लग्नासाठी लागणाऱ्या वरमाला किंवा इतर फुले घेवू शकता. दादरनंतर 'लालबाग' मध्येही लग्नाची खरेदी केली जाते. दागिने घ्यायचे असतील मुंबईमधील 'झवेरी बाजार' येथे सोन्यापासून जर्मन सिल्व्हरपर्यंत, पारंपरिक ते फॅशनेबल सगळ्या प्रकारचे दागिने मिळतात. कपड्यांसाठी 'क्रॉफर्ड मार्केट', 'मनिष मार्केट', 'भुलेश्वर', 'मंगलदास मार्केट' हे सर्वोत्तम पर्याय आहेत. पेहराव, दागिने, मेकअप, पादत्राणे, गिफ्ट, भांडी सगळं काही या मार्केटमध्ये मिळतं. 'गिरगाव' म्हणजे मिनी पुणे असे म्हणतात तिथे तुम्हाला 'मोत्याचे' उत्तम प्रतिचे 'दागिने' मिळतील. मोत्याच्या मुंडावळ्या, तनमणी, चिंचपेटी, गहू तोडे म्हणजे खास वधुसाठी मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी गिरगावात करु शकता. सध्या हळदीला फुलांचे दागिने घालतात ते सुद्धा गिरगाव किंवा क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतात. लग्नाच्या पत्रिका तयार करण्यासाठी गिरगाव हा उत्तम पर्याय आहे. चर्नीरोड स्टेशनला उतरल्यानंतर लग्नपत्रिका तयार करणारी अनेक दुकाने दिसतील. तसं दादर आणि बोरीवली येथेही लग्नाची पत्रिका तयार करून मिळते. सध्या ठाण्यात सुद्धा कलामंदिर, कलानिकेतन, वस्त्रम, रुपम येथे साड्यांची खरेदी करु शकता. मुंबईमधील अनेक प्रसिद्ध मॉलमध्ये पेहरावासोबत मेकअपचे साहित्य खरेदी करु शकता. तेव्हा आता लग्नाची खरेदी करताना कुठे जायचं असा प्रश्न विचारु नका. या ठिकाणांना आवर्जून भेट द्या आणि मनसोक्तपणे खरेदी करा 

अनिता किंदळेकर

 

 

Logged in user's profile picture