उत्सव नवरात्रीचा ! या वर्षी देवीचा सण असा साजरा होईल

8 minute
Read
ghatsthpna.jpg

गणपती बाप्पा गेले, पितृपक्ष संपला, आता आतुरता आहे ती दुर्गा मातेच्या आगमनाची ! पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून घटस्थापनेची म्हणजे नवरात्रीची सुरुवात होणार आहे. येत्या ७ तारखेला घटस्थापना होणार असून नवरात्रीची सुरुवात होणार आहे. नवरात्रीचा उत्सव १५ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे, ज्यादिवशी आपण दसरा सण साजरा करणार आहोत आणि देवीचे विसर्जन करणार आहोत. दुर्गा देवीच्या ९ वेगवेगळ्या रूपांचे पूजन आणि आराधना या ९ दिवशी केली जाते. त्यामुळे सर्वत्र उत्सवाचे आनंदी वातावरण असणार आहे. यावर्षी माता दुर्गा देवी गुरुवार या दिवशी येणार असल्याने ती पालखी मध्ये बसून येणार आहे. देवी भागवत पुराणानुसार देवी रविवार किंवा सोमवार या दिवशी येणार असेल तर ती हत्ती वर स्वार होऊन येते. शनिवार किंवा मंगळवारी आली तर ती घोडयावर स्वार होऊन येते, आणि गुरुवार किंवा शुक्रवारी आली तर ती पालखीत बसून येते. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवी आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला आनंदी ठेवते. हिंदू पंचांगानुसार यावेळी देवीचा कालावधी हा नऊ दिवसांऐवजी आठ दिवसांचा आहे.

आपल्याकडे गणपती उत्सवाप्रमाणेच नवरात्री उत्सव साजरा केला जातो. चौकाचौकांमध्ये नवरात्रीचे मंडप उभारले जातात. अनेक ठिकाणी मंडळे देखील असतात. ही मंडळे नवरात्रीचा उत्सव धुमधडाक्यात पार पडतात. नवरात्रीचा उत्सव महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला पाहू या नवरात्रीची धमाल कशी असते.

२०२१ मधील नवरात्रीच्या नऊ साड्या

२००४ पासून महाराष्ट्रात स्त्रियांनी नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालायची पद्धत आणली आहे.  त्यानुसार २०२१ मध्ये कोणत्या रंगाची साडी कधी घातली पाहिजे ते बघा.

पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबरला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे.

दुसऱ्या दिवशी - हिरवा

तिसऱ्या दिवशी - ग्रे म्हणजे राखाडी रंग

चौथ्या दिवशी - ऑरेंज म्हणजे नारिंगी

पाचव्या दिवशी - पांढरा

सहाव्या दिवशी - लाल

सातव्या दिवशी - रॉयल ब्लु म्हणजे निळा

आठव्या दिवशी - गुलाबी

नवव्या दिवशी - पर्पल म्हणजे जांभळा

नवरात्रीच्या कथा

असे सांगितले जाते कि नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीने दैत्यांसोबत भीषण युद्ध करून दैत्यांना मारले आणि दैत्यांचा राजा महिषासुर याचा देखील वध केला. म्हणून दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी असे देखील म्हणतात. वाघावर बसलेली हातात तलवारी, खडग, शस्त्रे घेऊन आरूढ झालेली सुंदर मूर्ती नवरात्रीमध्ये सगळीकडे स्थापित करून पूजा केली जाते. विदर्भात या देवीला भुलाबाई म्हणून संबोधिले जाते. भाद्रपद पौर्णिमेला शंकर पार्वतीची मूर्ती स्थापन केली जाते. टिपऱ्यांच्या तालावर मुले मुली नाचताना बेभान होतात. आजकाल टिपऱ्यांबरोबर दांडिया देखील प्रत्यके ठिकाणी खेळला जातो. जेवण झाले कि सर्व मुले मुली नटून सजून, हातात टिपऱ्या घेऊन लगबगीने देवीकडे निघालेली असतात. सर्वत्र ट्रेंडिंग टिपऱ्यांच्या गाण्यावर ताल धरून टिपऱ्यांचा खणखणाट स्वर ऐकायला मिळतो. अनेक ठिकाणी गाणी म्हटली जातात. नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीमध्ये प्रवेश केला. तो दिवस आश्विन शुध्द दशमीचा होता. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात.

सारांश

देवीच्या आगमनाने नऊ दिवस सर्व वातावरण स्त्रीमय होऊन जाते. सर्वत्र मुली आणि स्त्रिया यांचा जल्लोष असतो. कुमारिकेची पूजा देखील केली जाते. या निमित्ताने मुली आणि स्त्रियांमध्ये देवीसारखा जोश देखील भरला जातो. अनेक सार्वजनिक संदेश देखील दिले जातात. त्याचप्रमाणे देवीच्या प्रति भक्तिभाव देखील अर्पण केला जातो. भजने गायिली जातात. फुलांचा मौसम असल्याने सर्वत्र वातावरण प्रफुल्लित दिसते. एकंदरीत सर्व लोक देवीच्या निमित्ताने एकत्रित येऊन गुजगोष्टी करतात. आनंदाची उधळण नृत्याद्वारे करतात आणि वेगवेगळे संदेश देऊन जनजागृती देखील करतात. तरुणाईला मोकळिकता मिळून सर्वांशी मिसळून विचारांची देवाणघेवाण होते. यातून विविध मानवी संस्कृतीचे दर्शन आणि विकास पाहायला मिळतो.

image-description
report Report this post