महाराष्ट्राची शान असलेली मऊ-लुसलुशीत पुरणपोळी बनवण्याची झटपट रेसिपी

6 minute
Read
puran-poli.jpg

Highlights
महाराष्ट्रीयन पारंपरिक पुरणपोळी ही सर्वत्र लोकप्रिय आहे. हा पदार्थ भारतभर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि बनवला जातो. बहुतांश राज्यांमध्ये पुरणपोळी बनवली जाते परंतु वेगवेगळ्या पद्धतीने असते. महाराष्ट्रीयन पद्धत मात्र भन्नाट असते. अगदी मऊ आणि स्वादिष्ट असलेली पुरणपोळी हि महाराष्ट्रात खाण्यासाठी बाहेरून लोक येतात. ही पुरणपोळी बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत आपण येथे बघणार आहोत.

महाराष्ट्राचा लोकप्रिय स्पेशल मेन्यू म्हटलं कि पुरणपोळी सर्वांसमोर येते, अगदी महाराष्ट्राची आन- बाण -शान म्हणून ! घरात काही गोड धोड म्हटले कि पुरणपोळी सर्वांची आवडती रेसेपी असते. पुरणपोळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी घरात एखादी चांगली गोष्ट घडली, सण आला किंवा घरात कुणी पाहुणे आले तर घरात पटकन पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी व्हायची. ज्याच्या घरात पुरणपोळी बनते त्याच्या घरात काहीतरी मंगलमय घडले आहे हे नक्की असतं. आपल्याकडे हिंदू धर्मानुसार देवाला जर नैवद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळी बनली पाहिजे आणि त्याचाच नैवद्य दाखवला पाहिजे असा अट्टहास असतो. पुरणपोळी बनणार या बातमीने घरातील लहान थोर खूप सुखावलेले असतात. त्यांच्या जिभेला पाणी सुटलेले असतात. वारंवार त्यांचे लक्ष स्वयंपाक घराकडे असते. अशी हि गोड स्वादिष्ट पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी आज तुम्हाला येथे सांगणार आहोत. कारण,  नागपंचमी झाली कि आपल्या सण - सनावळ्यांना सुरुवात होते. लाडू संपेपर्यंत म्हणजे दिवाळी संपेपर्यंत आपले सण एकपाठुन एक असे येतच असतात. चला पाहूया खमंग पुरणपोळीची अनोखी रेसिपी –

साहित्य :

१ कप गव्हाचे पीठ

१ कप मैद्याचे पीठ

१ कप चना डाळ

१ कप किसलेला गूळ

चवीपुरते मीठ

हळद

वेलची पूड

जायफळ पूड

तेल

साजूक तूप

पुरणपोळी बनविण्यासाठी पुरण वेगळे बनवावे लागते आणि कणिक देखील व्यवस्थित मळून घ्यावे लागते. त्यामुळे गोंधळ उडतो सर्वात आधी काय करायचं. तर आपण येथे बघणार आहोत कि मऊ, लुसलुशीत, टमदार पुरणपोळी बनविण्यासाठी काय काय ट्रिक्स वापरता येतील.

कृती आणि ट्रिक्स:

एक कप चना डाळ ७ ते ८ तास पाण्यामध्ये भिजून घ्या. नंतर भिजलेली डाळ कुकरमध्ये पाणी, अर्धा चमचा तेल आणि चिमूटभर हळद टाकून शिजवून घ्या. हळद टाकल्याने पुरणाला छान रंग येतो. मिडीयम हिटवर ५ ते ६ शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घ्या. डाळ शिजेपर्यंत आपण पोळ्यांसाठी कणिक मळून घेऊ या. त्यासाठी एक कप गव्हाचे पीठ आणि एक कप मैद्याचे पीठ मिक्स करून त्यामध्ये चिमूटभर हळद आणि पाव चमचा मीठ टाका. थोडे थोडे पाणी घालून कणिक सैल पीठ मळून घ्या. पीठ मळताना हाताला पीठ चिकटते अशावेळी तेल लावून पीठ मळणे गरजेचे असते. पीठ मळून झाल्यावर साधारणतः १ तास पीठ मुरण्यासाठी ठेवा कारण पीठ जितके जास्त मुरेल तितक्या पोळ्या मऊ लुसलुशीत बनतील.

डाळ मऊ शिजली असेल तर डाळ आणि डाळीतील पाणी वेगळे करा. या डाळीच्या पाण्याची आपण कटाची आमटी करत असतो. पाणी गाळून घेतल्यानंतर उरलेली डाळ स्मॅशर ने स्मॅश करून घ्या किंवा रवी ने घोटून घ्या. डाळ बारीक घोटून झाल्यानंतर एक कप डाळीसाठी एक कप बारीक किसलेला गूळ घाला. हे मिश्रण गॅसवर ठेऊन मिक्स करा. गूळ डाळीमध्ये विरघळला कि मिश्रण पातळ बनेल परंतु मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहा.  साधारणतः २०- २५ मिनिटे हे मिश्रण गॅसवर शिजवल्यावर ते घट्ट होईल. ते सारखे ढवळत रहा. शेवटी त्यामध्ये थोडी वेलचीपूड आणि जायफळ पूड मिक्स करा. मिश्रण घट्ट झाल्यावर ते गॅस बंद करा आणि ते थंड करा. पुरण थंड झाल्यावर आपण पुरणपोळी बनवायला घेऊ या.

कणिक थोडे चिकट झाले असेल तर पुन्हा एकदा थोडेसे तेल लावून ते पुन्हा एकदा मळून घेऊ या. मऊसूद गोळा बनल्यावर पोळी अगदी मऊ होते. एक छोटासा गोळा करून ते कोरड्या पिठात घालून छोटीसी मोदकासारखी पारी करून घ्या. पारी करताना त्याचे काठ पातळ ठेवा आणि मध्यभाग थोडासा जाडसर ठेवा. म्हणजे पोळी मध्यभागी फुटणार नाही. पुरण घालून पारी बंद करून घ्या. जास्तीचे पीठ काढून घ्या. वरून कोरडे पीठ लावून पोळी लाटून घ्या. पोळी हलक्या हाताने गोल लाटून घ्या.

गरम तव्यावर पोळी टाका. पोळीला खालच्या बाजूने बुडबुडे आले कि पोळी उलटून घ्या. त्यानंतर त्यावर तुम्ही साजूक तूप लावा किंवा तेल देखील लावू शकता.

पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील तूप किंवा तेल लावा. पोळी अगदी टमदार फुगलेली असेल. पोळी एक दोन वेळा पलटून चांगली भाजून घ्या आणि नंतर ताटामध्ये काढून घ्या. थोडी थंड झाल्यानंतर खायला घ्या. तुम्हाला जाणवेल कि पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट बनलेली असेल.

सारांश -

वरीलप्रमाणे कृती आणि ट्रिक्स वापरल्यास कमी वेळात मऊ खमंग लुसलुशीत पोळ्यांचा स्वयंपाक झटपट बनवता येतो. पोळीबरोबर गुळवणी किंवा दूध खाल्ले जाते. त्यामध्ये साजूक तूप देखील वरून टाकले जाते. बरोबरच कटाची आमटी, भात, भजी, तळलेली कुरडई आणि पापडी असा जेवणाचा थाट परंपरेने मांडला जातो. आता महाराष्ट्रीयन सणांची सुरुवात पुरणपोळीच्या जेवणाने सुरुवात झाली आहे. पुढील सण देखील पुरणपोळीच्या स्वादिष्ट भोजनाने गोड करा आणि आपला आनंद साजरा करा.

image-description
report Report this post