झटपट बनवा बघताच तोंडाला पाणी सुटेल असा खमंग वडापाव!

5 minute
Read

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

'चल वडापाव खायला जाऊ!' - हे एक असं वाक्य आहे जे आपण सगळेच मिस करतोय यात शंकाच नाही. वडापाव असला की आपली दुपारची नाश्त्याची वेळ किती मस्त मजेदार बनून जायची आणि आपल्याभोवती असलेल्या वडापाव स्टॉल्सच्या कृपेने आपला संध्याकाळच्या चहाचा फक्कड प्लॅन बनून गेलेला असायचा, हे आठवतं का? आपण सगळेच लॉकडाऊनमध्ये गेलो तेव्हापासून मनसोक्त वडापाव खाणे आणि तो कुरकुरीत वडा आणि नरम-नरम पाव यांची चव जिभेवर रेंगाळत राहणे हे आपण सगळेच मिस करतोय, बरोबर?

कधी ना कधी महाराष्ट्रात राहिलेला प्रत्येक माणूस या खमंग आणि सर्वत्र आढळून येणाऱ्या पदार्थाचा निस्सीम चाहता असतो. वडापावची चव तोंडात कशी हळूहळू उलगडत जाते आणि त्यासोबत आठवणींचा खजिनासुद्धा उघडत जातो. म्हणूनच, तुमची वडापावची तलफ शमवण्यासाठी ही आहे एक अत्यंत सोपी रेसिपी जिचा वापर करून तुम्ही यम्मी वडापाव आणि चवदार सुकी लसूण चटणी तुमच्या किचनमध्येच बनवू शकता!

ही घ्या रेसिपी!

तयारीसाठी वेळ - १५ मिनिटे

बनवण्यासाठी वेळ - ४५ मिनिटे

साहित्य -

वडा बनवण्यासाठी -

• ताजे उकडलेले बटाटे
• बेसन
• मीठ, लाल तिखट, मोहरी, हळद
• कढीपत्ता
• खाद्यतेल
• हिरवी मिरची
• हिंग

सुकी लसूण चटणी बनवण्यासाठी -

• शेंगदाणे
• तीळ
• लसूण पाकळ्या
• खवलेला नारळ
• मीठ
• लाल तिखट

कृती-

वडे-

१. एका कढईत दोन मोठे चमचे तेल घालावे आणि ते गरम होऊ द्यावे.

२. मग त्यात मोहरी-हिंगाची फोडणी करावी आणि थोड्या बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. फोडणी तडतडू लागली की अर्धा चमचा हळद आणि कढीपत्त्याची पाने घालून मंद आचेवर परतावे.

३. मग त्यात उकडलेले बटाटे घालून सगळे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. उलथण्याच्या साहाय्याने बटाट्याचा दाबून लगदा करावा आणि तो २ ते ५ मिनिटे परतून घ्यावा.

४. बटाटे आणि सगळा मसाला चांगला मिक्स झाला की मग तो कढईतून काढून घ्यावा आणि एका ताटात पसरून थंड होऊ द्यावा.

५. आता एका बाऊलमध्ये ४ ते ५ मोठे चमचे बेसन घ्या.

६. बेसनात मीठ, हळद आणि लाल तिखट घाला आणि चांगले ढवळून घ्या.

७. त्यात साधारण १ कप एवढे पाणी घाला आणि मध्यम ते पातळ असे भज्याचे पीठ (बॅटर) बनवून घ्या.

८. हे पीठ बाजूला ठेवून बटाट्याचे मिश्रण थंड झाले की नाही ते बघा.

९. मग बटाटयाच्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे बनवून ते बाजूला ठेवून द्यावेत.

बटाटयाच्या मिश्रण

१. एक वेगळी कढई घ्या आणि त्यात पुरेसे तेल ओतून ते मंद आचेवर ५ ते १० मिनिटे गरम होऊ द्या.

२. तेल गरम झाले की एकावेळी ३ ते ४ गोळे घ्या, ते बेसनाच्या भिजवलेल्या पिठात चांगले घोळा आणि तेलात खमंग तळून घ्या.

३. वडे चांगले तळले जावेत यासाठी आच मंद असणे आवश्यक आहे.

४. ते चांगले बदामीसर रंगावर तळले गेले की मग जास्तीचे तेल निथळून घ्या आणि वडे कढईबाहेर काढा.

५. त्यातले अतिरिक्त तेल शोषले जावे म्हणून हे वडे किचन नॅपकिनवर काढून ठेवावेत.

६.सगळ्या वड्यांसाठी हीच कृती वापरा.

तळले वडे

सुक्या लसूण चटणीसाठी-

१. कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात ८-१० लसणाच्या पाकळ्या हलक्याश्या तळून घ्या.

२. त्यात अर्धा कप शेंगदाणे आणि २ मोठे चमचे तीळ घाला.

३. जेव्हा तीळ तडतडू लागतील, तेव्हा अर्धा कप खवलेला नारळ त्यात घाला.

४. मीठ आणि लाल तिखट घालून सगळे साहित्य चांगले ढवळून घ्या.

सुक्या लसूण चटणी

१. हे सगळे साहित्य एका लहान मिक्सरमध्ये ओतून घ्या.

२. १ ते २ मिनिटे हलकेच वाटून घ्या.

३. मग ते वाटण बाहेर काढा आणि तुमची सुकी लसूण चटणी तयार आहे!

मग आता यम्मी वडापावसाठी लागणारं सगळं साहित्य तुमच्याकडे आहे! तर मग आणखी वाट पाहू नका. पाव मधून चीर देऊन कापा, पावाच्या खालच्या बाजूवर थोडी सुकी लसूण चटणी भुरभुरा आणि गरमागरम कुरकुरीत वडा त्यात घालून महाराष्ट्राच्या हृदयात वसणाऱ्या या डिशचा मनसोक्त आस्वाद घ्या.

वडापाव

हा एक मस्त-मजेदार स्नॅक बनवताना तुम्हाला खूप मजा आली असेल आणि तुम्ही तो मसाला चहाच्या वाफाळणाऱ्या कपाबरोबर गट्टम् केला असेल अशी आम्ही आशा करतो!

मस्त खा, मस्त राहा! :)

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

वडापाव बनवायचे साहित्य काय आहे?
वडा बनवण्यासाठी –

ताजे उकडलेले बटाटे

बेसन

मीठ, लाल तिखट, मोहरी, हळद

कढीपत्ता

खाद्यतेल

हिरवी मिरची

हिंग

सुकी लसूण चटणी बनवण्यासाठी -

शेंगदाणे

तीळ

लसूण पाकळ्या

खवलेला नारळ

मीठ

लाल तिखट