इतिहास to समकालीन: १० सर्वोत्तम नाटक

12 minute
Read
best marathi plays.jpg

आपल्या महाराष्ट्रात मराठी कला क्षेत्राला दैवी देणगी लाभली आहे. बालगंधर्व, अण्णासाहेब किरलोस्कर, विजया मेहता, पु. ल. देशपांडे, वसंतराव आणि अजून नावं घेऊ तितकी कमी पडतील. या पैकी काही हयात आहेत आणि काही कालवश, पण प्रत्येकांनी त्यांचा काळ हा गाजवलाच. आज आपण सिनेमा बघू शकतो ही सुद्धा एका मराठी माणसाची कृपा. पण सगळ्यात पहिले लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तर रंगभूमीवर सादर केलेल्या नाटकांनी.

यात दिलेली नाटकच फक्त सर्वोत्कृष्ट आहे असं मुळीच नाही किंवा इथे दिल्यानुसार क्रमानेच त्यांची उत्कृष्टता ठरते असं ही नाही. ही फक्त नाटकांची एक यादी आहे, ज्या नाटकांवर रसिकप्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं!

  • पती सगळे उचापती

Source: mymarathicinema.com

दिग्दर्शक - विजय पाटकर

लेखक - सुरेश जयराम

कलाकार - कुलदीप पवार, चेतन दळवी आणि कीर्ती गोसावी

कुलदीप पवार आणि चेतन दळवी एकाच रंगमंचावर आलेत म्हणजे रसिकप्रेक्षकांचं हसून हसून पोट दुखेल यात काहीच वाद नाही. प्रमुख पात्रांपैकीच एक पात्र विकी त्याच्या लग्नाच्या बाबतीत त्याच्या काकांशी खोटं बोलतो जेणेकरून त्याचा भत्ता वाढून मिळेल. 

हे सगळं चालू असतांना त्याचा खुप जवळचा मित्र सदानंद कऱ्हाडे म्हणजेच चेतन दळवी हा त्याचा बायको बरोबर त्याच्या घरी राहायला आला असतो. तेव्हाच विकीचे काका म्हणजे कुलदीप पवार हे त्याच्या पुतण्याला आणि सुनेला भेटायला त्याच्या घरी जातात आणि विकीच्या मित्राच्या बायोकला विकीची बायको समजून बसतात. मग या प्रसंगाला ते कसे तोंड देतात, या सगळ्या ओढाताणीवर हे नाटक आहे!

  • शांतेचं कार्ट चालू आहे!

Source: webmallindia.com

दिग्दर्शक - प्रकाश बुद्धिसागर

लेखक - श्रीनिवास भणगे 

कलाकार - लक्ष्मीकांत बेर्डे, नयनतारा आणि सुधीर जोशी

आज संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही जर विनोदी कलाकारांबाबत चर्चा चालू असेल आणि त्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख झाला नाही, हे शक्यच नाही. हे दोघेही म्हणजे सुधीर जोशी त्याच्या बायकोमुळे आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्या आईमुळे म्हणजे घरातल्या त्या एकाच स्त्रीच्या रागीट स्वभावामुळे कंटाळले असतात. याच्याच बरोबरीत लक्ष्मीकांत बेर्डेचं एका मुलीवर प्रेम होतं आणि ते दोघं लग्न करण्याचं ठरवतात पण आईच्या परवानगी शिवाय ते शक्य नाही म्हणून “एक तीर से दो निशाने”, अशी भूमिका घेत हे दोघं बापलेकं एक युक्ती शोधतात आणि स्वतःच्या घरी प्रेम पत्र पाठवतात जे त्याच्या आईच्या हातात लागतं. 

त्या नंतर काय होतं, त्यांच्या आयुष्यात अजून काय घडामोडी घडतात आणि यावर लख्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची गम्मत या सगळ्याने हे नाटक नटलेलं आहे. ५ वर्षाधी या नाटकाचे नवीन प्रयोग पुन्हा सुरु करण्यात आले होते. ज्यात प्रमुख भूमिकेत होते प्रियदर्शन जाधव, भालचंद्र कदम आणि विशाखा सुभेदार.

  • वासूची सासू

Source: marathionline.com

दिग्दर्शक -  विनायक चासकर

लेखक - प्रदीप दळवी

कलाकार - अविनाश खर्शीकर, अरुण नलावडे, अतुल परचुरे आणि दिलीप प्रभावळकर

वासू हे पात्र दिलीप प्रभावळकरांच्या घरी म्हणजेच अण्णांच्या घरी किरायाने राहत असतो. पण त्याला तिथे राहण्यासाठी अण्णांच्या बायकोची एक अट पूर्ण करायची असते ती म्हणजे अण्णांना ६ महिन्यात धर्मेंद्र बनवण्याची. त्याच सोबत अजून बरेच बंधन त्यावर लादले असतात त्यापैकी एक म्हणजे त्याला भेटायला येणाऱ्या लोकांनी काही ठराविक दिवशीच यायचं. 

पण नकळत तो त्याचा प्रेयसीला त्याचा घरी बोलवतो. तेव्हाच त्याला त्याच्या ऑफिसला सुद्धा जायचं आहे हे आठवतं. आता काही कारण सांगायचं म्हणून तो ऑफिस मध्ये फोने करून त्याची सासू वारली म्हणून सांगतो आणि हे ऐकल्यावर त्याची ऑफिसवाली मंडळी, अंतःसंस्कारासाठी त्याच्या घरी येतात. आता वेळेवर सासू कुठून आणायची म्हणून अण्णांनाच स्त्रीवेष चढवून तिरडीवर झोपवतात. आता दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाबाबत काही वेगळं सांगायची गरज नाहीच. या संपूर्ण २ अंकी नाटकात अगदी पापणी लवण्याइतकी सुद्धा हे कलाकार संधी देत नाही.

  • श्रीमंत दामोदर पंत

Source: timesofindia.com

दिग्दर्शक - केदार शिंदे

लेखक - केदार शिंदे

कलाकार - भरत जाधव, रागिणी सामंत, राजीव सावंत, श्रीकांत आणि विजय चव्हाण.

कुठल्याही नाटकाच्या बाहेर "प्रमुख भूमिकेत सुपरस्टार भरत जाधव" अशी पाटी दिसली म्हणजे ते नाटक हमखास लोकप्रिय होणारच. त्याच प्रमाणे श्रीमंत दामोदर पंत या नाटकाने रसिकांची मनं जिंकली. या नाटकाचं रूपांतर नंतर सिनेमात सुद्धा करण्यात आलं होतं. या नाटकात भरत जाधव यांनी दामू नावाची भूमिका केली आहे. कित्येक वर्षांचा इतिहास असणाऱ्या या घराण्यात रोज संध्याकाळी दामूच्या आत श्रीमंत दामोदर पंत शिरतात आणि मग नेमकं काय होतं ती सगळी गम्मत या नाटकात कैद आहे! जर तुम्हाला विनोदी नाटकांचा छंद असेल तर हे नाटक तुम्ही नक्की पाहावं.

  • पुन्हा सही रे सही

Source: bookmyshow.com

दिग्दर्शक - केदार शिंदे

लेखक - केदार शिंदे

कलाकार - जयराज नायर, मनोज टाकणे, मृणाल भुस्कुटे आणि भरत जाधव

भरत जाधव यांचा अफलातून अभिनय आणि केदार शिंदे यांचं लेखन दिग्दर्शन असलेलं असं हे तुफानी नाटक आहे, जे कुठलयही नाटक प्रेमीने चुकवू नये. श्री मदन सुखात्मे, एका यशस्वी उद्योजकाची कथा जी अचानक गायब झाली. तो मृत असल्याचे गृहीत धरून त्याचे वकील तीन वेगवेगळ्या इच्छापत्र आणि त्यानुसार चार वेगवेगळे लाभार्थी घेऊन येतात. एक त्यांची दुसरी पत्नी मीरा, एक त्यांचे दीर्घकाळ गमावलेले काका अण्णा आणि शेवटच्या इच्छेनुसार त्यांची पहिली पत्नी आणि त्यांची मुलगी. तीन पक्षांना संपूर्ण मालमत्ता स्वतः हवी आहे परंतु एकच अडचण आहे की कोणत्याही इच्छापत्रावर मदनची स्वाक्षरी नाही. यातून बाहेर पडण्याचे फक्त दोन मार्ग आहेत, एक, मालमत्तेचे समान वितरण करणे आणि दुसरा, जर मदन सुखात्मे आले आणि अंतिम इच्छा काय आहे हे सांगितले. आणि मग खेळ सुरू होतो.

तिन्ही पक्ष त्यांचे स्वतःचे मदन सुखात्मे आणतात, रंगा - एक ट्रक चालक, हरी - एक मानसिकदृष्ट्या विकलांग माणूस आणि गलगले - अधिक बोलणारे एलआयसी एजंट. ते सर्व मदन सुखात्मे म्हणून सापडले असे दिसण्यासारखे प्रशिक्षण घेतात आणि शेवटच्या दिवशी मूळ मदन सुखात्मे देखील येतात. ते सर्व एकाच छताखाली एकूण गोंधळ आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्हाला वेड्यासारखे हसवेल.

  • तू म्हणशील तसं!

Source: bookmyshow.com

दिग्दर्शक - प्रसाद ओक

लेखक - संकर्षण कऱ्हाडे

कलाकार - संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई

एक उत्तम कवी, ताकदीचा अभिनेता आणि कमालीचा लेखक असा संकर्षण कऱ्हाडे याचं हे नाटक, ज्यात त्याने भक्ती देसाई सोबत प्रमुख भूमिका देखील वठवली आहे आणि या नाटकाचं लेखन सुद्धा केलं आहे. प्रसाद ओक यांचं दिग्दर्शन आणि गौरी प्रशांत दामले निर्मित तू म्हणशील तसं, हे नाटक २०२० मध्ये लोकांच्या भेटीला आलं.

हे नाटक एका नवविवाहित जोडप्याला कठीण परिस्थितीत अडकून आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करण्याबद्दल आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण शोधण्याच्या प्रक्रियेला, ते शेवटी गोंडस भांडणातून संपवतात. ज्याच्याशी सर्वी जोडपी “relate” करू शकतील. संकर्षण याचे निरागस विनोद फेकण्याची शैली आणि त्याला ओकांच्या दिग्दर्शनाचा प्रसाद, मग अजून काय हवा!

  • नटसम्राट

Source: webmallindia.com

दिग्दर्शक - पुरुषोत्तम दारव्हेकर

लेखक - कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)

कलाकार - डॉक्टर श्रीराम लागू आणि शांता जोग

डॉ श्रीराम लागू, शांता जोग, कुसुमाग्रज, कदाचित ही नावच पुरेशी असावी या नाटकाची पात्रता, विशेषता आणि लोकप्रियता सांगण्याकरिता. गणपत रामचंद्र बेलवलकर म्हणजे अप्पा बेलवलकर ज्याने कित्येक भूमिकांना अजरामर केलं, आपल्या स्वतःचा जीव त्या पात्रांमध्ये ओतला, ज्याने स्वतःच्या भाग्यरेषेवर रंगभूमी चितारून टाकली आणि “न भूतो न भविष्यती” असा असामान्य नट, नटसम्राट झाला. ज्या माणसाची एक झलक दिसावी म्हणून रसिकमायबाप आपला जीव ओवाळून टाकत असत तोच हा नटसम्राट अप्पा साहबे बेलवलकर आपल्याच मंडळींचा डोळ्यात बोचायला लागला, त्याला घरून निघून जावं लागलं आणि बऱ्याच हालपेष्ठा सोसाव्या लागल्या. 

अश्या एका विलक्षण नटाची शब्दातीत गाथा यात कुसुमाग्रजांच्या अकल्पनीय लेखणीतून आणि लागूंच्या वाखाण्याजोगी अभिनयातून साकारल्या गेली आहे. सर्वप्रथम हे नाटक १९७० मध्ये रंगमंचावर प्रस्तुत करण्यात आलं होतं. २०१६ मध्ये या नाटकाचं रूपांतर एका सिनेमात करण्यात आलं ज्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर होते आणि प्रमुख भूमिका ही नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकर यांनी वठवली होती.

  • बॅरिस्टर

Source: cyberspaceandtime.com

दिग्दर्शक - विजया मेहता

लेखक - जयवंत दळवी

कलाकार - विक्रम गोखल आणि सुहास जोशी

विक्रम गोखलेंचा असामान्य अभिनय आणि विजया मेहता यांचं अतुलनीय आणि प्रगल्भ दिग्दर्शन या दोन्ही महानद्यांचा संगम म्हणजे हे नाटक, बॅरिस्टर. बॅरिस्टर हे एक प्रामाणिक कायदेशीर व्यावसायिकांबद्दलचे नाटक आहे ज्यांनी १९१० च्या दशकात स्त्री -पुरुष समानतेचे समर्थन केले. त्याने तरुण विधवांचे कष्ट आणि सामान्य सामाजिक जीवनापासून वंचित असलेल्या कठोर सामाजिक संरचनांचा कटाक्षणाने विरोध केला. त्याचे आयुष्य शोकांतिकेत कसे संपते याबद्दलची एक काळजी ओरबाडून काढणारा ही गाथा आहे.

  • रायगडाल जेव्हा जाग येते

Source: filmytake.wordpress.com

दिग्दर्शक - मास्तर दत्ताराम वळवईकर

लेखक - वसंत कानेटकर

कलाकार - डॉक्टर काशिनाथ घाणेकर आणि मास्तर दत्ताराम वळवईकर

छत्रपती शिवाजी महाराज - इतिहासातील सगळ्यात यशस्वी राजा आणि त्याच प्रमाणे त्यांच्या थोरल्या सुपुत्रांचे म्हणजेच संभाजी राज्यांचे वडील. शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा म्हणजे राजाराम. त्यामुळे सिंहासनाचा नैसर्गिक उत्तराधिकारी हे संभाजीच असायला हवे पण हा निर्णय प्रत्येकांना पटलाच असावा असे मुळीच नाही. नातेसंबंध आणि या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका, हे वडील आणि मुलाची जोडी यांच्यातील अंतरामुळे झालेल्या गैरसमजांवर हे नाटक आधारित आहे.

उत्तराधिकार संघर्षासाठी न्यायालयीन कारस्थान आणि योजना या आश्चर्यकारक रचलेल्या नाटकात महत्वाची भूमिका बजावतात. या नाटकाच्या लोकप्रियतेचा मोठा भाग नाटकातील पात्रांमुळे झाला असावा पण याचा अर्थ कानेटकरांचं लेखन कुठे कमी पडलं असावं असं मुळीच नाही. काही नाटकं त्याच्या लोकप्रियतेतून इतिहास घडवतात. काही त्याच्या पात्रांमुळे अजरामर होतात आणि काही नाटकं लेखणीमुळे. पण रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला तर जणू रंगदेवतेचाच आशीर्वाद लाभला असावा. कारण संभाजीच्या प्रमुख भूमिकेत स्वतः डॉ. काशिनाथ घाणेकर, शिवाजींच्या भूमिकेत मास्तर दत्ताराम, लेखक वसंत कानेटकर ज्यांचा कडून शब्दकोश सुद्धा शब्द घेत असतील आणि दिग्दर्शक कलाक्षेत्राचा प्रघाड अनुभव असलेले पुरुषोत्तम दारव्हेकर. आता ही मंडळी एकत्र आल्यावर इतिहास तर घडणारच!

  • संगीत कट्यार काळजात घुसली

Source: youtube.com

दिग्दर्शक - पुरुषोत्तम दारव्हेकर

लेखक - पुरुषोत्तम दारव्हेकर

संगीत - पंडित जितेंद्र अभिषेकी

कलाकार - डॉ. वसंतराव देशपान्डे, प्रसाद सावरकर आणि भार्गवराम आचरेक

संगीत नाटक म्हंटलं की कट्यार काळजात घुसली या नाटकाचं नाव सगळ्यांचाच मुखावर येतं. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीतून अस्तित्वात उतरलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत दिग्दर्शनातून अमर झालेलं आणि स्वयं डॉ. वसंतराव देशपांडे, अभिषेकी बुवा आणि प्रसाद सावरकर सारख्या महान गायकांचा पदांनी अजरामर झालेलं नाटक म्हणजे कट्यार. 

ही कथा एका भारतीय शास्त्रीय गायकावर आधारित आहे, खाँसाहेब ज्याला त्याच्या संगीताच्या घराण्याबद्दल अत्यंत अभिमान आहे, तो आपल्या घराण्याची शैली इतर कोणालाही गाऊ देण्यास तयार नाही. राज गायकाच्या स्वसंरक्षणासाठी खानसाहेब यांना दिवाणजी कट्यार सादर करतात, ज्याचा वापर करून खांसाहेबांना एक हत्या माफ असते. २०१५ मध्ये सुबोध भावेने या नाटकाचा रूपांतर एका सिनेमात सुद्धा केलं ज्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि नवीन पिढीला पुन्हा एकदा तो सुवर्ण काळ अनुभवता आला.

मराठीला नाटकांना खूप मोठा इतिहास आहे आणि तो फक्त १० नाटकांनी संपूष्टात येणं शक्यच नाही. संगीत मानापमान, एकच प्याला, मोरूची मावशी, कुर्यात सदा टिंगलाम, शांतता कोर्ट चालू आहे आणि अजून नावं घेऊ तितकी कमी. सध्या आपण सगळे आपापल्या घरी आहोत आणि घरी तुमच्या मनोरंजना करिता ही नाटकांची यादी तुमच्या कामात येईल आणि यात नमूद केलेली सगळी नाटकं तुम्हाला आवडतील ही आशा!

 

image-description
report Report this post