आतुरता बाप्पाच्या आगमनाची! वाचा कसा साजरा केला जातो गणपतीमहोत्सव

8 minute
Read
ganesh1.jpg

Highlights
प्रत्येक वर्षी आपल्या घरी एक स्पेशल पाहुणा येत असतो. त्याच्या स्वागताची सर्वजण आनंदाने वाट बघत असतात. घरी सजावट करून जल्लोषाने त्यांना आणले जाते. महाराष्ट्रात तर ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक काढून घरी आणले जाते, ओळखा पाहू कोण ? सगळ्यांनाच कल्पना आली असेल हे वर्णन कुणासाठी आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ या शब्दांची गर्जना कानात आणि ओठांवर एव्हाना घुमली देखील असेल. गणपती उत्सव महाराष्ट्राला सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा सण. महाराष्ट्राची ओळखच आहे गणपती उत्सव ! परंतु या कोरोनाकाळात सर्वांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेऊन सण साजरा करा आणि कोरोनासंकट दूर करण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करूया.

गणपती उत्सवाची महती आणि इतिहास

गणपती हे हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहे. कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ करण्यापूर्वी श्रीगणेशाला पुजले जाते. गणपती हा विघ्नहर्ता आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे फक्त नामस्मरण केले तरी लोकांमध्ये उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकता निर्माण होते. अशी आख्यायिका सांगितली जाते कि ३३ कोटी देवतांमधून सर्वात आधी कुणाला पुजले गेले पाहिजे हा प्रश्न जेव्हा सर्व देवतांना पडला तेव्हा भगवान शंकराने सर्व देवतांना ब्रह्मांड प्रदक्षिणा करायला सांगितली. जो लवकर प्रदक्षिणा करेल त्याला सर्वात आधी पुजले जाईल असे ठरले. तेव्हा गणपतीने युक्ती लढवून आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्माण्ड प्रदक्षिणा पूर्ण केली. सर्व ब्रह्माण्डमध्ये आई वडील सर्वोच्च असून त्यांच्या चरणाजवळ संपूर्ण ब्रम्हांड असते हे मान्य करून गणपतीला सर्वात आधी पूजनाचा मान मिळाला. महादेवांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्मोत्सव साजरा केला, गणपतीने सिंदूर दैत्यावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी विजय  मिळवला होता. पेशव्यांचे आराध्य दैवत देखील गणपती होते. शनिवारवाड्यातील गणेश महालात गणपती उत्सव साजरा केला जात असे. त्यावेळी दीड, पाच, दहा दिवस असा उत्सव होता. आजही त्याचप्रमाणे वाटचाल सुरू आहे. शनिवारवाड्यातून दशमीला फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढली जात असे. लोकमान्य टिळकांमुळे गणपतीला देश परदेशात मान मिळाला. तिबेट, चीन, जावा, बार्ली, बोर्निओ, तुर्कस्थान, मेक्सिको अशा अनेक देशांमध्ये गणेशाला स्थान मिळाले.

सध्याच्या काळात गणपती उत्सवाची गरज

१८९२ पासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची जी सुरुवात केली ती आजतागायत आहे. गणपती उत्सवाचे कारण सांगताना टिळक म्हणतात कि, ज्यावेळी संकट येते तेव्हा एकमेकांना उपदेशाची, पैशाची, सल्लामसलतीची मदत करून सज्ञान करणे हि समाजशील प्राण्याची गरज आहे त्यामुळे आपण एकमेकांच्या जवळ येतो. एकोप्याची भावना वाढीस लागते. ज्या योगाने आपला संबंध निकटतर होत जाईल, त्या त्या गोष्टी करणे आणि करविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. आपला इतिहास पहिला तर लक्षात येईल कि आपल्या आपापसांतील दुराव्यांमुळेच जवळजवळ हजार वर्षे बाहेरच्या लोकांनी राज्य केलेले आहे. आजही आपले जीवन साचेबंद आहे. काम आणि घर एवढंच उरलंय आयुष्यात. शेजाऱ्यांशी देखील बोलणे होत नाही. कुणी आजारी किंवा संकटात आहे हे देखील समजत नाही. परंतु गणेशोत्सव आला कि सर्वजण एकत्र येऊन गुजगोष्टी होतात. आनंदाचे वातावरण बनते. नवीन नाती तयार होऊन आनंदाचे बंध तयार होतात. गणपती आरतीला लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आनंदाने श्रीगणेशाचे गुणगान गातात. किती मनमोहक दृश्य आणि आनंदी सोहळा असतो तो !

गणेशजन्माची कथा

पुराणकथेनुसार माता पार्वतीला एकदा अंघोळीला जायचे होते परंतु बाहेर कुणी पहारेकरी नसल्यामुळे तिने मातीची एक मुर्ती बनवली. त्यात प्राण फुंकले आणि  त्याला पहारेकरी नेमुन ती अंघोळीला गेली. त्याचवेळी भगवान शंकर तेथे आले. नेमलेल्या पहारेकऱ्याने त्यांना रोखले.  भगवान शंकरानी संतापुन त्याचा शिरच्छेद केला त्याचवेळी माता पार्वती स्नानाहुन परतल्या.  समोर दिसलेल्या प्रकाराने माता पार्वती प्रचंड संतापली. मातेचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना आज्ञा केली कि सर्वप्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर घेऊन या. सेवकाने हत्तीचे शिर आणले आणि तेच शिर त्या धडावर बसविण्यात आले. तो दिवस भाद्रपद शुध्द चतुर्थीचा दिवस होता म्हणून या दिवशी गणपती उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली. भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. तिचे महात्म्य अधिक असते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते.

गणपती आणि गौराई महोत्सव

गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. वेगवेगळी आरास सजवून आपण गणेशाची प्रतिष्ठापना करतो. गणपती प्रतिष्ठापना करताना आणलेल्या मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर आरती आणि नैवेद्य दिला जातो. गणपतीला २१ दुर्वांची माळ घालण्याची परंपरा आहे. गणपतीला लाल जास्वदांचे फुल देखील वाहतात. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. दुसऱ्या दिवशी गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. कोकणकडच्या भागात उंदीरमामाला प्रसाद म्हणून मांसाहारी अन्न देखील अर्पण केले जाते. या दिवशी उंदराला मारले जात नाही. तिसऱ्या दिवशी गौरींचे आगमन होते. सासरी गेलेल्या मुली यादिवशी माहेरी येतात. गौराईचे स्वागत खूप छान केले जाते. घराच्या अंगणापासून तर दरवाज्याच्या उंबरठ्यापर्यंत चालत आणले जाते आणि नंतर धान्याचे माप ओलांडून घरामध्ये त्यांना आणले जाते. गणपती शेजारी त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांना भाजी भाकरीचा नैवद्य दाखवला जातो. चौथ्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन केले जाते. यादिवशी गौरीसाठी १६ भाज्या, खीर, पापड, भात, आमटी, चकल्या करंज्या, लाडू चिवडा असे अनेक पदार्थ बनवले जातात कारण गौरी त्यावेळी माहेरवाशीण असते. हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. अनेक वस्तू एकमेकांना भेट दिल्या जातात. गणपती आणि गौरीचं नातं हे बहीण भावाचं नातं मानलं जात. गौराईचे विसर्जन हे गणेशमूर्तीच्या विसर्जनावेळीच केले जाते. 

गणपतीचा नैवद्य मोदक

गणपतीला प्रसाद म्हणून मोदक अर्पण केला जातो. मैदा, खवा, तूप, गूळ, नारळापासून मोदक तयार केले जातात. आजकाल मोदकाचे अनेक रंगीबेरंगी प्रकार आणि रेसिपीज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वेगेवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवले जातात जसे कोकणात वेगवेगळ्या आकाराचे गणपती बावळे जातात आणि त्यांचे मोदकही! म्हणूनच मोठ्या संख्येने लोक कोकणात गणपती पहावयास जातात.

समारोप

बाप्पाच्या स्वागताची, पूजनाची आणि समारोपाच्या पद्धती, चालीरीती जरी वेगवेगळ्या असल्या तरी बाप्पाच्या भक्तीची भावना हि प्रेमळ निर्मळ आणि शुद्ध अंतःकरणाची असते. बाप्पासोबतचे दहा दिवस म्हणजे स्वर्गातले दहा दिवस असा अनुभव असतो गणपती उत्सवावेळी! सगळ्यात जास्त आनंद चिल्लर पार्टीची असते कारण त्यांचे सर्वच लाड यावेळी पूर्ण केले जातात . घरात पाहुण्यांची ये जा असते त्यामुळे वादविवाद कुठेही नसतात. सगळीकडे आनंदीआनंदच असतो. बायका आणि मुलीदेखील पारंपरिक पद्धतीने  नटून थटून आपला जलवा दाखवणायचे काम करतात. दहावा दिवस मात्र नाराजीचा असतो. सर्वजण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत त्यांची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.

 

image-description
report Report this post