करिअरमध्ये ‘अपस्किलिंग’ महत्वाचे का आहे?

10 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

आपल्याला हे माहीती आहे की ‘बदल’ ही एकच गोष्ट आयुष्यात सातत्यपूर्ण असते. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक महामारीची साथ, प्रगत तंत्रज्ञान आणि लोकांच्या दृष्टिकोनात झालेला बदल या काही घटनांमुळे आपल्या व्यावसायिक आयुष्यात आणि आपण त्याकडे कसे पाहतो यात फार मोठा बदल घडून आलेला आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळावे म्हणून सतत, अविरत काम करत राहण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. खूप जास्त मेहनत करत राहण्यापेक्षा चातुर्याने, चलाखीने काम करणे ही आता कामाची नवीन आणि प्रभावी पद्धत आहे.

आपल्याला ‘स्मार्ट’ पद्धतीने काम करायचे असते तेव्हा 'अपस्किलिंग' आणि 'रीस्किलिंग' यांचा उपयोग होतो. या संज्ञाचा अर्थ काय हे आधी पाहूया. ‘अपस्किलिंग’ म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जी काही कौशल्ये (स्किल्स) असतात त्यात भर पडावी, सुधारणा व्हावी म्हणून नवीन कौशल्ये शिकण्याची प्रक्रिया. ‘रीस्किलिंग’ म्हणजे अगदी वेगळाच जॉब करण्याच्या दृष्टीने पूर्णतः नवीन अशी कौशल्ये शिकण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत, अपस्किलिंगमुळे निवडलेल्या  करिअरमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यास व्यक्तीला मदत होते तर रीस्किलिंगमुळे करिअर बदलण्यास मदत होते.

सध्याच्या काळात, व्यक्ती आणि कंपन्या किंवा त्यांचे मालकसुद्धा अपस्किलिंग महत्वाचे मानतात कारण त्यामुळे त्यांना सतत बदलत राहणारा कामाच्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि या स्पर्धात्मक युगात टिकून राहणे शक्य होत असते. हल्लीच्या काळात अपस्किलिंगचे महत्व कित्येक पटींनी का वाढले आहे हे आता समजून घेऊया.

उत्पादनक्षमता वाढते: अपस्किलिंगमुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडत असल्याने त्या व्यक्तीच्या कौशल्यामध्ये भर पडते. त्यामुळे तुमची कामे तुम्ही अधिक प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने करू शकता.

आत्मविश्वास वाढतो: अपस्किलिंगमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. अपस्किलिंगच्या माध्यमातून तुम्ही अधिक ज्ञान मिळवलेले असल्याने तुम्ही तुमचे काम अधिक आत्मविश्वासाने करू शकता आणि तुम्हाला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी सक्रिय पद्धतीने काम करू शकता.

नवनवीन गोष्टी शिकण्याची एक संस्कृती वाढीला लागते: माणूस म्हणून आपण दररोज काही ना काही नवीन शिकत असतो असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. काहीवेळा, कामाचा प्रचंड तणाव आणि ठरवून  गेलेला नित्यक्रम यामुळे नवीन गोष्टी शिकणे कठीण होऊन बसते. पण अपस्किलिंगमुळे यावर मात करता येते. नवनवीन गोष्टी शिकण्याची आपली उर्मी त्यामुळे जागृत होते आणि बदलत्या काळासोबत आपणही अद्ययावत होतो.

बदलांशी जुळवून घेणे सोपे जाते: आपले जसजसे वय वाढत जाते तसतसे आपण नवीन बदलांच्या बाबतीत अधिक असहिष्णू आणि बेपर्वा होत जातो. परंतु, जेव्हा आपण अपस्किलिंगचा पर्याय निवडतो तेव्हा बदलत्या जगाशी जुळवून घेणे किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे बदल होणे आणि ते स्वीकारणे का आवश्यक आहे हे आपल्याला समजून घेता येते.

संधीची दारे खुली होतात: जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती नवीन कौशल्ये शिकते, आत्मसात करते, तेव्हा त्या व्यक्तीला साजेशा अशा विविध संधी तिच्यासमोर येतात. नवीन कौशल्ये शिकण्याच्या प्रक्रियेत, तुम्हाला अधिक चांगल्या संधी लाभू शकतात आणि विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तींची ओळख होऊ शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या क्षमता लक्षात येऊ शकतात.

तुमचे महत्व वाढते: सध्याच्या स्पर्धात्मक युगात, तुम्ही अद्ययावत राहणे हे अत्यंत महत्वाचे होऊन जाते. अपस्किलिंगमुळे तुमच्या केवळ ज्ञानातच भर पडते असे नाही, तर त्यामुळे तुमच्या आसपासच्या लोकांना याची जाणीव होते की तुम्ही त्यांच्यासाठी मौल्यवान आहात आणि तुमच्यामुळे त्यांना नेहमीच मदत होते.

कोणत्या क्षेत्रात अपस्किलिंग केले पाहिजे हे कसे ओळखावे

तुमच्या आवडीनिवडी लक्षात घ्या

कोणत्या क्षेत्रात अपस्किलिंग केले पाहिजे हे ओळखण्याची सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःशी संवाद साधून आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे लक्षात घेणे. हे अगदीच पायाभूत वाटू शकते, पण पायाभूत गोष्टीच सर्वात महत्वाच्या असतात. उगाच करायचे म्हणून अपस्किलिंग केल्याने काहीही फायदा होणार नाही. म्हणून ज्या क्षेत्रात अपस्किलिंग करणार आहात ते क्षेत्र तुमच्या आवडीचे असणे हे महत्वाचे आहे.

तुम्हाला कामाच्या ठिकाणी त्याची मदत होईल का?

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी अधिक चांगली होईल असे एखादे कौशल्य निवडल्याने तुमची कार्यक्षमताच फक्त वाढेल असे नाही तर त्याचे तत्काळ फायदेसुद्धा तुम्हाला दिसून येतील. तुमची कामगिरी अधिक चांगली व्हावी म्हणून नेहमी असे एखादे नवीन कौशल्य निवडावी जे तुमच्या कामाशी संबंधित असेल.

स्पर्धात्मक युगात त्याचा काही फायदा होईल का?

कौशल्य विकास आणि सुधारणा याबाबत जेव्हा तुम्ही विचार करत असाल तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारणे महत्वाचे आहे. तुम्ही जे नवीन कौशल्य शिकेल ते तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची असलेल्या तुमच्या स्पर्धेत कामाला येईल का? जसजसा काळ जाईल तसे इतरांच्या तुलनेत तुमच्याकडे काही वेगळे, अधिक चांगले असणे ही गोष्ट तुम्हाला नेहमीच फायद्याची ठरेल.

तुम्हाला त्याचा दीर्घकालीन फायदा होईल का?

व्यक्तिगत विकासासाठी आपण काही कौशल्ये शिकत असलो, तरी अशी काही नवीन कौशल्ये शिकून घेणे महत्वाचे आहे जी तुम्हाला दीर्घ काळासाठी उपयोगी पडतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर तुम्हाला दीर्घकालीन स्वरूपात मदत करतील अशाच कौशल्यांमध्ये स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि पैसा गुंतवा.

तुम्ही सध्या कामाच्या ठिकाणी जी भूमिका निभावत आहात त्यात एखादे कौशल्य कमी पडतेय का?

तुमच्या सध्याच्या जॉबमध्ये तुमच्याकडून कायकाय अपेक्षा आहेत हे समजून घ्या आणि त्याचे विश्लेषण करा. सध्याच्या कामात तुमची कामगिरी आणखीनच चांगली होईल अशी कौशल्ये कोणती आहेत त्याचा शोध घ्या. ही कौशल्ये शिकल्याने स्पर्धात्मक वातावरणात तुम्ही अधिक आत्मविश्वासाने वावरू शकाल आणि अद्ययावत राहाल.

कोणत्या क्षेत्रात तुम्हाला रस आहे हे एकदा तुम्ही ओळखले की मग खालीलपैकी कोणतीही पद्धत निवडून तुम्ही अपस्किलिंग करू शकता.

 

ऑनलाईन प्रशिक्षण

आजकाल आणि विशेषतः जागतिक महामारी सुरु झाल्यावर ऑनलाईन कोर्स शोधणे हे अगदीच सोपे झाले आहे. ‘लिंक्डइन लर्निंग’, ‘स्किलशेअर’ इत्यादी सारखी अनेक पोर्टल्स परवडण्याजोग्या किमतींमध्ये ऑनलाईन अपस्किलिंग कोर्स देऊ करतात. या ऑनलाईन कोर्सची एक उत्तम गोष्ट ही असते की तुम्ही तुमच्या वेगाने ते पूर्ण करू शकता.

मायक्रोलर्निंग

मायक्रोलार्निंग म्हणजे प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत जो अभ्यासक्रम असतो त्याचे छोटे छोटे भाग करून शिकणे. आजकाल तुमची कौशल्य विकसित करण्यासाठी बरीच वर्कशॉप्स (कार्यशाळा) आणि परिसंवाद उपलब्ध असतात. त्यांना हजेरी लावून तुम्ही तुमची कौशल्ये विकसित करू शकता.

मार्गदर्शकाकडून शिकणे (मेन्टॉरिंग)

एखाद्या प्रत्यक्ष अनुभव असेलल्या व्यक्तीकडून शिकणे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मार्गदर्शक म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड करून त्या व्यक्तीच्या अनुभवातून शिकू शकता. त्यांच्या कामाचे निरीक्षण करणे आणि त्यांच्याशी चर्चा करणे यातूनही बरेच शिकता येईल. परंतु, यामध्ये तुम्हाला जे कौशल्य शिकायचे आहे त्याचा तगडा अनुभव असलेली व्यक्तीच मार्गदर्शक म्हणून तुम्ही निवडत आहात याची खात्री करून घ्या.

कोचिंग

कोच (प्रशिक्षक) हे असे मार्गदर्शक असतात ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे प्रशिक्षण घेतलेले असते. तुमच्या गरजांना साजेसे असे कोचिंगचे स्वरूप असते आणि त्याने तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यात मदत होते.

'अपस्किलिंग' आणि 'रीस्किलिंग' यामुळे केवळ तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक कार्यक्षमतेने काम करू लागता असेच नाही तर नवनवीन गोष्टी शिकण्याचा तुमचा उत्साह त्यामुळे वाढीला लागतो, एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रगल्भ होता आणि स्वतःबद्दलचा तुमचा आत्मविश्वास आकाशाला गवसणी घालतो.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture




None
None