पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात

14 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

'बेबी ब्लूज' (बाळंत झाल्यावर उदास, खिन्न वाटणे) हा शब्दप्रयोग तुम्हाला बहुधा माहीत असेल. कारण नुकतेच आई बनलेल्या स्त्रीला दुःखी, चिंताग्रस्त किंवा थकलेले वाटणे ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत ८०% मातांना या भावनांचा अनुभव येतो. हे अत्यंत नॉर्मल आहे आणि या भावना काही आठवड्यांनंतर ओसरतात. बाळाला जन्म दिल्यावर, यापैकी १५% पर्यंत स्त्रियांना अधिक तीव्र स्वरूपाच्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या डिप्रेशनचा अनुभव येतो. त्याला 'पोस्टपार्टम डिप्रेशन' असे नाव आहे. पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये भावनांचे चढउतार, वारंवार रडू येणे, थकवा, अपराधीपणाची भावना , अँगझायटी (anxiety) आणि बाळाची काळजी घेण्यात असमर्थता ही लक्षणे दिसून येतात. पोस्टपार्टम डिप्रेशन ही एखादी उणीव किंवा कमजोरी नाही. काहीवेळा बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत होणारा तो एक आजार असतो. तुम्हाला जर पोस्टपार्टम डिप्रेशन आले असेल तर त्यासाठी तातडीने योग्य वैद्यकीय मदत घेतल्याने त्याची लक्षणे निवळण्यात आणि तुमच्या बाळाशी तुमचा एक बंध निर्माण करण्यात तुम्हाला मदत होऊ शकते.

पोस्टपार्टम डिप्रेशनचे प्रकार कोणते आहेत?

  • पोस्टपार्टम उदास भावना: या अवस्थेला इंग्रजीत 'बेबी ब्लूज' असे देखील म्हणतात. बाळाला जन्म दिल्यावर ५० आणि ७५ टक्के यादरम्यान स्त्रियांना ही भावना अनुभवास येते. तुम्हाला जेव्हा हे 'बेबी ब्लूज' येतील तेव्हा तुम्हाला वारंवार, खूपवेळ, विनाकारणच रडू येईल तसेच खूप दुःखी, उदास वाटेल आणि अँगझायटी सुद्धा अनुभवास येईल. ही अवस्था सहसा बाळाचा जन्म झाल्यावर पहिल्या आठवड्यात (पहिला ते चौथा दिवस) स्त्रियांमध्ये दिसून येते. यात खूप अस्वस्थ वाटत असले तरी ही अवस्था कोणत्याही उपचाराविनाच दोन आठवड्यांत बरी होते. याकाळात तुम्हाला फक्त गरज असते ती बाळाची काळजी आणि घरकाम यात मदत आणि दिलाशाची.
  • पोस्टपार्टम डिप्रेशन: पोस्टपार्टम उदास भावनेपेक्षा (पोस्टपार्टम ब्लूज) ही खूप गंभीर अवस्था आहे. नुकत्याच आई बनलेल्या स्त्रियांपैकी, अंदाजे, प्रत्येक दहा स्त्रियांमागे एका स्त्रीमध्ये ही अवस्था दिसून येते. तुम्हाला आधीच्या बाळंतपणात जर पोस्टपार्टम डिप्रेशन आलेले असेल तर पुढच्या बाळंतपणात ते येण्याचा धोका ३०%नी वाढतो. भावनांचे चढउतार, वारंवार रडू येणे, चिडचिड, थकवा तसेच अपराधीपणाची भावना, अँगझायटी आणि बाळाची किंवा स्वतःची काळजी न घेऊ शकणे ही सर्व लक्षणे दिसून येऊ शकतात. लक्षणे सौम्य किंवा तीव्र कशाही स्वरूपाची असू शकतात आणि बाळाचा जन्म झाल्यावर लगेचच ते पुढे हळूहळू अगदी एक वर्षानंतर सुद्धा दिसून येऊ शकतात. ही लक्षणे अनेक आठवडे किंवा अगदी वर्षभरसुद्धा दिसून येत असली तरी सायकोथेरपी (psychotherapy) किंवा अँटीडिप्रेसंट्स हे त्यावरचे अत्यंत प्रभावी उपचार आहेत.
  • पोस्टपार्टम सायकॉसिस: हा पोस्टपार्टम डिप्रेशनचा अत्यंत तीव्र प्रकार आहे ज्यामध्ये तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते. ही अवस्था फारशी दिसून येत नाही. दर १००० स्त्रियांच्या मागे फक्त एका स्त्रीमध्ये, बाळाच्या जन्मानंतर ती दिसून येते. डिलिव्हरी झाल्यावर काही वेळातच लक्षणे दिसू लागतात आणि ती तीव्र असतात. ही लक्षणे काही आठवड्यांपासून ते अनेक महिन्यांपर्यंत टिकू शकतात. आत्यंतिक चिडचिड, गोंधळून जाणे, हताश वाटणे, कशाचीतरी सतत लाज वाटत राहणे, निद्रानाश, सतत कशाचीतरी भीती वाटणे, भ्रम आणि भास होणे, खूप चळवळी प्रवृत्ती होणे, अतिजलद बोलणे, उन्मादाची अवस्था येणे ही सर्व याची लक्षणे आहेत. पोस्टपार्टम सायकॉसिसमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार करणे अत्यंत आवश्यक असते कारण त्यात स्त्रीचा आत्महत्येने मृत्यू होण्याचा किंवा तिने बाळाला इजा पोहोचवण्याचा धोका वाढलेला असतो. सामान्यतः मातेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून औषधे चालू करणे असे उपचाराचे स्वरूप असते.

 

पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणे काय आहेत?

पोस्टपार्टम डिप्रेशन नक्की कोणत्या कारणाने होते हे जरी अज्ञात असले तरी काही घटक पोस्टपार्टम डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात. शारीरिक आणि भावनिक बिघाड या दोन्हींच्याही मिश्रणाने पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकते.

 

शारीरिक घटक

बाळाला जन्म दिल्यावर शरीरात होणारा सर्वात जास्त ठळक बदल हार्मोन्समध्ये दिसून येतो. जेव्हा तुम्ही गरोदर असता, तेव्हा तुमच्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरोनची पातळी नेहमीपेक्षा जास्त असते. जन्म दिल्यावर काही तासांतच हार्मोन्सची पातळी गरोदर राहण्याच्या आधीच्या पातळीवर येते. या अचानक होणाऱ्या बदलामुळे डिप्रेशन येऊ शकते.

 

इतर काही शारीरिक कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

  • थायरॉईड हार्मोनची पातळी कमी असणे
  • पुरेशी झोप न मिळणे
  • अपुरा आहार
  • आधीपासून असलेले काही निदान न झालेले आजार
  • ड्रग्ज आणि दारू यांचे यांचे अयोग्य सेवन

 

भावनिक घटक

तुम्हाला भूतकाळात जर एखादी 'मूड डिसऑर्डर' (भावनांसंबंधित आजार) झालेला असेल किंवा तुमच्या कुटुंबात कुणाला असा आजार असेल तर तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.

 

जे भावनिक घटक कारणीभूत ठरतात ते खालीलप्रमाणे असू शकतात:

  • नुकताच झालेला घटस्फोट किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू
  • तुम्हाला किंवा तुमच्या अपत्याला गंभीर आजार असणे
  • एकटेपणा
  • आर्थिक अडचणी
  • आधाराचा अभाव

 

या आजारात घडणाऱ्या गोष्टी

पोस्टपार्टम डिप्रेशनवर जर वेळीच उपचार केला नाही तर त्याचा आई आणि बाळाच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात.

 

  • आईच्या बाबतीत. वेळीच उपचार न झालेले पोस्टपार्टम डिप्रेशन अनेक महिने किंवा अनेक वर्षे देखील टिकून राहू शकते आणि त्याचे रूपांतर 'क्रॉनिक डिप्रेसिव्ह डिसऑर्डर'मध्ये होऊ शकते. उपचार केले तरीसुद्धा त्या स्त्रीला भविष्यात तीव्र स्वरूपाचे डिप्रेशन अनुभवाला येण्याचा धोका पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे वाढतो.
  • वडिलांच्या बाबतीत. पोस्टपार्टम डिप्रेशनचा एखाद्या उतरंडीवरून घसरण्यासारखा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला भावनिक ताण अनुभवावा लागू शकतो. नुकत्याच आई झालेल्या स्त्रीला जेव्हा डिप्रेशन येते तेव्हा बाळाच्या वडिलांनासुद्धा डिप्रेशन येण्याची शक्यता अधिक असते. आणि जरी बाळाच्या आईला डिप्रेशन आलेले नसेल तरीसुद्धा नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या वडिलांना डिप्रेशन येण्याचा धोका हा आधीच वाढलेला असतो.
  • मुलांच्या बाबतीत. उपचार न केलेले पोस्टपार्टम डिप्रेशन ज्या आईला असते तिची मुले भावनिक आणि वर्तनाच्या बाबतीतल्या समस्यांना सामोरी जाण्याची शक्यता अधिक असते. झोप आणि आहाराच्या समस्या, खूप जास्त रडणे आणि भाषा विकसित होण्यात उशीर होणे या समस्या अशा मुलांमध्ये दिसून येऊ शकतात.

 

प्रतिबंध

तुम्हाला जर आधी डिप्रेशन येऊन गेले असेल - विशेषतः पोस्टपार्टम डिप्रेशन - तर तुम्ही जेव्हा गरोदर राहण्याचा विचार करत असाल तेव्हा किंवा तुम्ही गरोदर आहात असे कळल्यावर लगेचच तुमच्या डॉक्टरांना सांगा.

  • तुमच्या गरोदरपणात डिप्रेशनची चिन्हे आणि लक्षणे दिसून येत आहेत का यावर तुमचे डॉक्टर बारीक लक्ष ठेवू शकतात. बाळंतपणात आणि डिलिव्हरी झाल्यावर ते तुम्हाला डिप्रेशन आहे की नाही हे तपासणारी प्रश्नावली भरायला सांगू शकतात. सौम्य स्वरूपाच्या डिप्रेशनवर काहीवेळा सपोर्ट ग्रुप, समुपदेशन किंवा इतर थेरपीच्या साहाय्याने उपचार केला जाऊ शकतो. इतर केसेस मध्ये अँटीडिप्रेसंट्स औषधे दिली जातात. ही औषधे गरोदर असतानासुद्धा दिली जाऊ शकतात.
  • तुमच्या बाळाचा जन्म झाल्यावर तुमचे डॉक्टर तुम्हाला लवकरच एक पोस्टपार्टम चाचणी करायला सांगू शकतात. या चाचणीतून पोस्टपार्टम डिप्रेशनची चिन्हे आणि लक्षणे तुमच्यात दिसून येत आहेत का हे तपासले जाते. जितक्या लवकर पोस्टपार्टम डिप्रेशनचे निदान होईल तितक्या लवकर उपचार सुरु करता येऊ शकतात. तुम्हाला जर आधी पोस्टपार्टम डिप्रेशन येऊन गेले असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला लगेचच अँटीडिप्रेसंट औषधे किंवा सायकोथेरपी (psychotherapy) सुरु करायला सांगू शकतात.

डॉक्टरांकडे केव्हा जावे

तुमच्या बाळाचा जन्म झाल्यावर तुम्हाला डिप्रेस्ड (उदास, खिन्न) वाटत असेल तर तुम्हाला तसे कबूल करण्यात संकोच किंवा लाज वाटू शकते. परंतु, तुम्हाला पोस्टपार्टम बेबी ब्लूज किंवा पोस्टपार्टम डिप्रेशनची कोणतीही लक्षणे तुमच्यात दिसून आली तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांची भेट घ्या. पोस्टपार्टम सायकॉसिसची लक्षणे दिसून येत असतील तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

तुम्हाला खालीलपैकी डिप्रेशनची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे तुमच्यात दिसून येत असतील तर तुमच्या डॉक्टरांना कृपया लवकरात लवकर संपर्क करा:

 

  • लक्षणे दोन आठवड्यांनंतर सुद्धा निवळत नाहीत
  • ती अजूनच तीव्र होताहेत
  • तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घेणे खूप कठीण जातेय
  • दररोजची कामे करणे तुमच्यासाठी खूप अवघड होऊन बसलेय

तुमच्या मनात स्वतःला किंवा बाळाला इजा पोहोचवण्याचे विचार येत आहेत

 

पोस्टपार्टम डिप्रेशनवरील उपचार

तुमच्यात जर पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणे दिसून येत असतील तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे जेणेकरून उपचारांना सुरुवात करता येईल.

औषधे आणि थेरपी हे पोस्टपार्टम डिप्रेशनवरचे दोन प्रमुख उपचार आहेत. ते वेगवेगळे असे केले जाऊ शकतात, पण एकत्र केल्यास त्यांचा जास्त चांगला परिणाम दिसून येतो. तसेच तुमच्या दैनंदिन नित्यक्रम आरोग्यदायी सवयींचा समावेश करणे हेदेखील अत्यंत महत्वाचे आहे.

तुमच्यासाठी सर्वात सुयोग्य अशी उपचारपद्धत कळून यायला डॉक्टरांना थोडे प्रयत्न करावे लागू शकतात. तुमच्या डॉक्टरांशी या काळात मनमोकळा संवाद ठेवायला हवा.

औषधे

अँटीडिप्रेसंट्सचा मेंदूवर लगेचच परिणाम होतो. ही औषधे मेंदूमध्ये काही रासायनिक बदल घडवून आणतात ज्यामुळे आपल्या मूडचे नियमन होते. परंतु या औषधांचे परिणाम दिसून यायला वेळ लागतो. तुम्हाला तुमच्या मूडमध्ये फरक दिसून यायला अनेक आठवड्यांचा कालावधी या उपचारपद्धतीत जाऊ शकतो.

काही व्यक्तींमध्ये अँटीडिप्रेसंट्सचे साईड इफेक्टस् दिसून येतात. थकवा, कामेच्छा कमी होणे आणि भोवळ येणे ही साईड इफेक्टस् ची काही लक्षणे आहेत. तुमच्या डिप्रेशनची लक्षणे या साईड इफेक्टस् मुळे आणखीनच विकोपाला जात असतील तर तुमच्या डॉक्टरांना त्याबाबत तत्काळ माहिती द्या.

काही अँटीडिप्रेसंट्स स्तनपानाच्या काळात घेण्यासाठी सुरक्षित असतात तर काही तशी नसतात. तुम्ही जर स्तनपान करत असाल तर तुमच्या डॉक्टरांना तसे सांगा. तुमची इस्ट्रोजनची पातळी जर कमी असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला हार्मोन घेणे सुरु करायला सांगू शकतात.

थेरपी

सायकायाट्रिस्ट (psychiatrist), सायकॉलॉजिस्ट (psychologist) किंवा मानसिक आरोग्यासंबंधित काम करणारे प्रशिक्षित लोक हे समुपदेशन करू शकतात. थेरपीमुळे आपल्या मनात येणारे विध्वंसक विचार - त्यांची कारणे, अर्थ हे समजू शकते आणि त्यांचा सामना कसा करायचा हे शिकता येते.

स्वतःची काळजी घेणे

उपचाराची ही बाजू दिसते त्यापेक्षा अधिक कठीण असू शकते. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वतःला थोडी मोकळीक देणे.

तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा जास्त जबाबदारी घेणे टाळावे. तुम्हाला कशाची गरज आहे हे कदाचित तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना कळणार नाही म्हणून तुम्ही ते त्यांना संवाद साधून सांगणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही ‘फक्त तुमच्यासाठी’ असा वेळ बाजूला काढायला हवा पण एकटेपणा येऊ देता कामा नये. नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांचा एखादा सपोर्ट ग्रुप (आधारगट) तुम्ही जॉईन करू शकता.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture




पोस्टपार्टम डिप्रेशनचे प्रकार कोणते आहेत?
<ol> <li>पोस्टपार्टम उदास भावना</li> <li>पोस्टपार्टम डिप्रेशन</li> <li>पोस्टपार्टम सायकॉसिस</li> </ol>
पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणे काय आहेत?
पोस्टपार्टम डिप्रेशन नक्की कोणत्या कारणाने होते हे जरी अज्ञात असले तरी काही घटक पोस्टपार्टम डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात. शारीरिक आणि भावनिक बिघाड या दोन्हींच्याही मिश्रणाने पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकते.
पोस्टपार्टम डिप्रेशनवरील उपचार काय आहेत?
औषधे आणि थेरपी हे पोस्टपार्टम डिप्रेशनवरचे दोन प्रमुख उपचार आहेत. ते वेगवेगळे असे केले जाऊ शकतात, पण एकत्र केल्यास त्यांचा जास्त चांगला परिणाम दिसून येतो. तसेच तुमच्या दैनंदिन नित्यक्रम आरोग्यदायी सवयींचा समावेश करणे हेदेखील अत्यंत महत्वाचे आहे