आपल्या पहिल्या मुलाला नवीन बाळासाठी कसे तयार करावे

8 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

नवीन बाळाच्या आगमनाची वार्ता प्रचंड आनंद आणि उत्साह घेऊन येते! पण जर तुमची दुसरी गर्भधारणा असेल, तर त्यासोबत काही आव्हाने उभी ठाकतात! सर्वात मोठे आव्हान म्हणजे - तुमच्या पहिल्या बाळाला नवीन बाळासाठी तयार करणे. लहान बाळ ही तुमच्यासाठी ओळखीची गोष्ट असू शकते परंतु तुमच्या मोठ्या मुलासाठी  हा पूर्णपणे नवीन अनुभव आहे, त्यामुळे त्या मुलाकडून कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया येतील अशी तयारी ठेवली पाहिजे! काही जण उत्साह दाखवू शकतात तर काही पूर्ण दुःख किंवा राग दर्शवू शकतात. काही मुले बरेच प्रश्न विचारू शकतात तर काही अजिबात कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत. प्रत्येक मूल वेगळे असते, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळी प्रतिक्रिया देणे पूर्णपणे सामान्य आहे. तुमच्या नवीन बाळाच्या आगमनापूर्वी तुमच्या मोठ्या मुलाला/ मुलीला सर्व नवीन अनुभवांसाठी तयार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना या बदलांशी जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.

a girl kissing her small sibling

तुमच्या मोठ्या मुलाला नवीन बाळासाठी कसे तयार करावे ते येथे दिले आहे:

तुमच्या मुलाला या मोठ्या बातमीचा भाग बनवा:

तुमचे मूल किती लहान किंवा मोठे आहे याने काही फरक पडत नाही,  तुमच्या पहिल्या मुलाला या मोठ्या बातमीचा भाग बनवणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे! प्रत्येक मूल वेगळे असल्याने, वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा करा आणि त्या प्रतिक्रिया तुमचे मूल कोणत्या वयोगटातील आहे यावर अवलंबून असतात. तुमचे पोट वाढत नाही तोपर्यंत ते काय आहे हे लहान मुलांना समजणार नाही, त्यामुळे तोपर्यंत प्रतीक्षा करणे सर्वोत्तम आहे आणि एकदा तुमचे पोट वाढू लागले की त्यांच्याशी याबाबत बोलण्यास सुरुवात करा. त्यांना सांगा की त्या वाढणाऱ्या पोटाच्या आत एक बाळ आहे.  मोठ्या मुलांचे म्हटले, तर ती बरेच प्रश्न विचारू शकतात! या प्रश्नांची उत्तरे तुमच्या मुलाला समजतील अशा पद्धतीने द्या.

तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात त्यांना सामावून घ्या:

या सुंदर प्रवासादरम्यान तुमच्या मोठ्या मुलाला आपण बाजूला सारले जात आहोत, असे कदाचित वाटू शकते आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. बाळाचे नाव ठरवताना किंवा अगदी बाळाच्या पाळणाघरासाठी थीम निवडताना, तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. त्यांना त्यांची मते आणि नवीन भावंडासाठी काय हवे आहे ते विचारा! जेव्हा तुम्ही खरेदीसाठी बाहेर जाता, तेव्हा तुमच्या मुलाला एखादे खेळणे किंवा पोशाख निवडू द्या, यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीवही होईल आणि आपण या सगळ्यात समाविष्ट आहोत असेही वाटत राहील. बाळासोबत ते किती चांगले वागू शकतील ते त्यांना सांगा आणि "तुम्ही या बाळाची बेस्ट बहीण/भाऊ व्हाल" यासारखी वाक्ये वापरा. ते स्वतः नवजात बाळ असताना कसे वागायचे ते त्यांना सांगा! त्यांना त्यांच्या बालपणीचे फोटो दाखवा आणि त्यांना सांगा की त्यांना लवकरच असे कोणीतरी पाहायला मिळणार आहे! त्यांना तुमच्या पोटाला स्पर्श करू द्या आणि सुरुवातीपासूनच बाळाशी बोलू द्या.

two siblings lying on a bed

तुमच्या नित्यक्रमातील सर्व अडजस्टमेन्ट आणि बदल आधीच करून ठेवा:

नवीन बाळाच्या आगमनाने बरेच बदल होऊ शकतात! बाळाच्या आगमनानंतर तुमच्या मोठ्या मुलाला खोल्या बदलण्याची आवश्यकता असल्यास, नवीन बाळाच्या जन्मापूर्वी ते करण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे तुमच्या मुलाला बदलाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ मिळेल. तुमच्या मुलाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवू द्या आणि त्यांच्याशी अधिक मैत्री होऊ द्या कारण ते तुमच्या शेवटच्या तिमाहीत, प्रसूती आणि जन्माच्या दरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतरही काही दिवस त्यांच्यासोबत घालवू शकतात. बाळाच्या आगमनानंतर दिनचर्या बदलेल याची त्यांना जाणीव करून द्या. तुम्ही त्यांना सरावासाठी बेबी डॉल घेण्याचा सुद्धा विचार करू शकता!

बाळाच्या जन्मानंतर:

नवीन बाळाचे आगमन खूप खास असते! तुमच्या पहिल्या जन्मलेल्या मुलांसाठीही हा क्षण खास बनवा! बाळाला पाहणारी  आणि धरून ठेवणारी पहिली व्यक्ती म्हणजे तुमचे मोठे मूल असू द्या. ते दोघे किती सारखे दिसतात ते त्यांना सांगा. म्हणा, "बघ, बाळ अगदी तुझ्यासारखे दिसते!". कोणीतरी तुमच्या बाळाला थोडा वेळ धरू द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या पहिल्या जन्मलेल्या प्रिय व्यक्तीसोबत मिठी मारण्यासाठी थोडा वेळ मिळेल. बाळाला घेऊन घरी आल्यावर, दोन्ही बाळांना एकमेकांना मिठी मारण्यासाठी पुरेसा वेळ द्या. त्यांना बाळाला मिठी मारू द्या आणि त्याचे पापे घेऊ द्या! तुमच्या मोठ्या मुलाला/ मुलीला नवीन बाळाशी सौम्यपणे वागायला शिकवा.  ‘आपले बाळ’ यासारखे शब्द वापरा, यामुळे मुलाला आपल्याला सामावून घेतल्याची जाणीव होईल.

a little boy kissing his newborn siblings hair

त्यांना तुमच्या स्तनपानाच्या प्रवासाचा एक भाग बनवा:

स्तनपान केल्याने तुम्हाला बाळाशी नाते जोडण्याची विशेष संधी मिळेल. ते तुमचा बहुतांश वेळ देखील घेईल. यामुळे तुमच्या पहिल्या मुलामध्ये मत्सराची भावना निर्माण होऊ शकते, ते आकांडतांडव करतील आणि ते सामान्य आहे. त्यांना या प्रवासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करा. स्तनपान करत असताना तुम्हाला काही उशा देऊन किंवा डायपर बदलताना तुम्हाला हात देऊन त्यांना तुम्हाला मदत करण्यास सांगा आणि त्यायोगे त्यांना या प्रक्रियेत सामावून घ्या. तुम्ही बाळाला दूध पाजत असताना तुमच्या मोठ्या मुलासाठी काही मजेदार अॅक्टिव्हिटीज प्लॅन करा. त्यांना गोष्टी वाचून दाखवा, एकत्र व्हिडिओ पहा किंवा काही खास खेळण्यांसह त्यांच्यासोबत खेळा.

गोष्टी इतक्या सोप्या नसतील तरीसुद्धा ठीकच आहे:

जर तुमचे मोठे मूल आकांडतांडव करत असेल किंवा त्याला मत्सर वाटला तर हे पूर्णपणे सामान्य आहे. ते बाळासोबत किती चांगले वागत आहेत किंवा त्यांचा बाळाला केलेला स्पर्श किती सौम्य आहे हे सांगून मुलाला प्रोत्साहित करा. जर तुम्हाला तुमच्या नवजात मुलासाठी नवीन भेटवस्तू मिळत असतील तर त्या नादात तुमच्या मोठ्या मुलाला विसरू नका. मोठ्या मुलाकडे देखील लक्ष देण्यासाठी सर्व पाहुण्यांशी आधीच संभाषण करा. तुम्हाला तुमचे प्रेम दोघांमध्ये विभागण्याची गरज नाही, फक्त दोन्ही मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवा. कधीकधी त्याला/तिला तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये, पार्कमध्ये घेऊन जा किंवा फक्त तुमच्या मोठ्या मुलासोबतच एखादी खास दिनचर्या/ रूटीन ठरवा!

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture




मी माझ्या पहिल्या मुलाला नवीन बाळासाठी कसे तयार करू?
<ol> <li>तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात त्यांना सामावून घ्या</li> <li>तुमच्या नित्यक्रमातील सर्व अडजस्टमेन्ट आणि बदल आधीच करून ठेवा</li> <li>त्यांना तुमच्या स्तनपानाच्या प्रवासाचा एक भाग बनवा</li> <li>गोष्टी इतक्या सोप्या नसतील तरीसुद्धा ठीकच आहे</li> </ol>